श्रीरामपूर : बससेवा नियमित नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील मातुलठाण येथील विद्यार्थ्यांसह पालकांनी आज दुपारी येथील एसटी आगारात दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्यांनी नियमित बस सोडण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने पालक आक्रमक झाले. त्यानंतर "उद्यापासून बससेवा नियमित सुरू होईल,' असे आश्वासन वाहतूक निरीक्षक किरण शिंदे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बससाठी आज 25 विद्यार्थिनी शाळा बुडवून पालकांसह दुचाकीवर आगारात आल्या होत्या.
मोफत सेवेचा उपयोग काय?
मातुलठाण येथे माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना पाच किलोमीटरवरील गोंडेगाव येथे जावे लागते. शाळेत जाण्यासाठी राज्य सरकारने मुलींसाठी मोफत पास सेवा दिली; परंतु गावात नियमित बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर पायपीट करून शाळा गाठावी लागते. गावात नियमित बस येत नसल्याने मोफत पास सेवा फोल ठरत आहे.
फोनच उचलत नाहीत
मातुलठाणला जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती झाली असूनही गावात नियमित बस येत नाही. बसची विचारणा करण्यासाठी आगारात फोन केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अनेकदा फोन उचलून बाजूला ठेवला जातो. अधिकारी सांगतात बस सोडली आहे; परंतु बस गोंडेगावाहून मातुलठाणला न जाता पुढे पुणतांब्याकडे जाते. अनेकदा शाळेच्या दिवशी न येता सुटीच्या दिवशी बस येत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. रविवारी बस सोडू नका, शालेय कामकाजाच्या दिवशी नियमित व वेळेवर सोडा, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी या वेळी केली.
बसची संख्या कमी असल्याने...
सध्या सहलीचा हंगाम सुरू असून, सहलीसाठी बस जातात. त्यामुळे नियमित मार्गांवर बस सोडण्यात अडचणी येतात. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी आगारातील तीन बस पाठविल्या आहेत. आगारात बसची संख्या कमी असून, 14 बस बाहेर पाठविण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेऊन उद्यापासून नियमित बस सोडण्यात येईल. बस वेळेवर पोचेल याची काळजी घेतली जाईल, असे वाहतूक निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.