विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

गगनबावडा - चांद्यापासून बांद्यापर्यंत जाणारी एसटी गगनबावडा तालुक्‍यातील काही गावांपासून अद्यापही दूर आहे. यामुळे दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही. माध्यमिक शिक्षणासाठीच नव्हे, तर उच्च प्राथमिक शिक्षणासाठीही येथील विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते.

गगनबावडा - चांद्यापासून बांद्यापर्यंत जाणारी एसटी गगनबावडा तालुक्‍यातील काही गावांपासून अद्यापही दूर आहे. यामुळे दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही. माध्यमिक शिक्षणासाठीच नव्हे, तर उच्च प्राथमिक शिक्षणासाठीही येथील विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते.

वेसरफ, पळसंबे ही गावे सुगम गावे आहेत. गावात डांबरी रस्ता आहे. पण, एस. टी. मात्र येत नाही. रुग्णांना, विद्यार्थ्यांना चालतच सुमारे तीनेक किलोमीटर अंतर कापावे लागते. पळसंबे व वेसरफ येथील विद्यार्थिनी मुसळधार पावसातही तीन-चार किलोमीटरची पायपीट करून शाळेत जातात. रोजचे हे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटर होते. एरवी सुसह्य वाटणारे हे अंतर उन्हाळ्यात जेव्हा सकाळची शाळा असते, तेव्हा खूपच तापदायक वाटते. ग्रामस्थांना दैनंदिन गरजांसाठीही असळज येथील बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. यासाठी रोजची यांची पायपीट ठरलेली आहे.

रुग्णांनाही असळजशिवाय दुसरा पर्याय नाही. कितीही आजारी असले तरी पायपीट करून दवाखान्यात जावे लागते. असळज येथील उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील माध्यमिक शाळेत वेसरफ येथील सुमारे २५ मुली शिक्षण घेत आहेत. पळसंबे येथूनही जवळपास तेवढ्याच मुली आश्रमशाळा व असळज येथील माध्यमिक शाळेत येतात.

वेसरफ व पळसंबे येथे एसटीची सोय नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थी रोज मुसळधार पावसात भिजतच येतात. ज्या गावांना एसटीची सोय आहे, तेथेही 
एसटी वेळेत नसल्याने अनेकदा मुलींना शाळेत येण्यास वेळ होतो. खोखुर्ले येथील विद्यार्थिनी एसटी न आल्याने पंधरा मिनिटे उशिराने आज पायाभूत चाचणीसाठी पोचल्या. 
- व्ही. आर. नाईक, शिक्षक, असळज

आम्हाला चालण्याची सवय झाली आहे. परंतु, किमान विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तरी सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करावी.
-भागोजी कोळेकर, वेसरफ 

सध्या मणदूरमधून रोज ३० ते ३५ मुली महाविद्यालयासाठी दोन किलोमीटर अंतरावरील मणदूर फाट्यापर्यंत चालत जात आहेत. 
सकाळी येथे येणारी पहिली एसटी बस गगनबावडा येथूनच हाउसफुल्ल होते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेकदा एसटीमध्ये घेतलेच जात नाही. सध्या कनिष्ठ महाविद्यालयाची परीक्षा सुरू आहे. पण, परीक्षेलाही वेळेत या विद्यार्थ्यांना जाता येत नाही. आज सकाळी स्वतः माझ्या गाडीने काही मुलींना महाविद्यालयात परीक्षेस पोचविले आहे.
- दगडू जाधव, मणदूर

शाळेसाठी करावी लागणारी पायपीट आता सवयीची झाली आहे. एखाद्या दिवशी सोबत कोणी नसेल तर शाळेत जाण्यास भीती वाटते.
- संपदा शेळके, विद्यार्थिनी, इयत्ता सहावी

एसटी सुरू नसलेली गावे
वेसरफ, पळसंबे, अणदूर, मणदूर, मांडुकली, वेतवडे.

Web Title: Student School St Walking