सरकारी पैशाने विद्यार्थ्यांची सहल 

संतोष सिरसट
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- राज्यातील पहिलाच प्रयोग 
- 26 हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा 
- विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण व आनंददायी शिक्षणास मदत

सोलापूर : अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करतात. पण, त्यासाठी लागणारा खर्च विद्यार्थ्यांकडून घेतला जातो. मात्र, आता राज्यातील 26 हजार 250 विद्यार्थ्यांची सहल ही सरकारी पैशाने होणार आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. 

हेही वाचा : मोतिराम वाघ... पर्यावरण रक्षणासाठी झटणारा अवलिया 
या ठिकाणी जाणार सहस 
"समग्र शिक्षा'अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान राबविले जाते. त्या माध्यमातून राज्याबाहेर व राज्यात विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण व आनंददायी शिक्षणास मदत होईल. त्यातून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानातही भर पडेल. शाळा-संस्था, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्रे, वस्तू संग्रहालय, प्राणी संग्रहालय, तारांगण, वारसा इमारती अभयारण्य, माहिती प्रसार केंद्रे, धरणे, मोठे तलाव या ठिकाणी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जायचे आहे.

हेही वाचा : चोरी करुन कपाटाला पुन्हा लावले कुलूप 

इतर जिल्ह्यांत शिक्षणामध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करणे, निरीक्षण करणे व त्याच्या आपल्या जिल्ह्यात उपाययोजना करणे हा यामागचा हेतू आहे. इतर राज्यांतही विद्यार्थ्यांना जाता येणार आहे. त्यामध्ये इस्रो ही संस्था पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थी निवडताना "अ' गटात असणाऱ्या शाळा, तीन वर्षे शाळा 100 टक्के प्रगत असावी, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळविलेले असावे यासारखे निकष शाळा व विद्यार्थी निवडताना लावायचे आहेत. 30 विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाला संधी मिळणार आहे. 

आकडे बोलतात 
- राज्याबाहेर सहलीला जाणारे विद्यार्थी ः तीन हजार 500 
- त्यासाठी केलेली तरतूद ः एक कोटी पाच लाख 
- प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तरतूद ः तीन लाख 
- प्रत्येक जिल्ह्यातून जाणारे विद्यार्थी ः 100 
- राज्यात सहलीला जाणारे विद्यार्थी ः 22 हजार 750 
- त्यासाठी केलेली तरतूद ः 45 लाख 50 हजार 
- प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तरतूद ः 200 रुपये 
- प्रत्येक जिल्ह्यातून जाणारे विद्यार्थी ः 650 

विद्यार्थ्यांच्या चौकसबुद्धीला चालना मिळेल. वैज्ञानिक जागृती, सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होणार आहे. 
- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Student trip in government money