'पर्यावरण वाचवा' साठी पाचगणीत विद्यार्थी उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जागतिक तापमान वाढीसंदर्भात लोकांमध्ये जागृती व उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. मुले फक्त अभ्यास करू शकतात. उपाययोजना करू शकत नाहीत. ते राज्यकर्त्यांचे व मोठ्या माणसांचे काम आहे. म्हणून आम्ही एक दिवस पाचगणीतील सर्व शाळा बंद ठेवून जनजागृतीपर अनोखे आंदोलन करून ग्रेटाला पाठिंबा दिला आहे. आम्ही सगळेच "ग्रेटा' आहोत.
- आदिती गोरडिया, व्यवस्थापिका, बिलिमोरिया स्कूल, पाचगणी. 

भिलार : ""जागतिक तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे "पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पाचगणी (ता. महाबळेश्वर) या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरत अभिनव आंदोलन केले. 

स्वीडन देशातील ग्रेटा थनबर्ग या 16 वर्षांच्या मुलीने जगभरातील विद्यार्थ्यांना हवामानासाठी शाळा बंद अशी साद घातली आहे. तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाचगणी येथील बिलिमोरिया हायस्कूलने आवाहन केल्याबरोबर सर्व शाळा, रोटरी क्‍लब व आय लव्ह पाचगणी संस्थेने त्यांना साद देत विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवून राज्यकर्ते, पालक, गावातील जबाबदार व्यक्तींमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता येण्यासाठी अनोखे आंदोलन केले. या रॅलीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी चौकात सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते केला. या रॅलीत सर्व शाळांचे विद्यार्थी, रोटरी व आय लव्हचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. "पर्यावरण वाचवा - पृथ्वी वाचवा' "झाडे लावा, झाडे जगवा'चे फलक घेऊन आंदोलन केले. पाचगणी शहरातून पाचगणीतील सुमारे 35 शाळांमधील विद्यार्थ्यांनी रॅली काढत जनजागृती केली. वृक्षतोड, वाढणारी सिमेंटची जंगले, पूर, सुनामी, दुष्काळ, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचे आवाहन रॅलीतून केले.
 

ग्रेटा थनबर्ग आहे कोण ! 

स्वीडनच्या अवघ्या 16 वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग या विद्यार्थिनीने पर्यावरण रक्षणासाठी हाक देत आंदोलन छेडले आहे. तिचे ता. 23 एप्रिल रोजी ब्रिटिश संसदेतही व्याख्यान झाले. त्या वेळी तिने चक्क सरकारची खरडपट्टी काढली. "सरकार पुरेसे काम करत नाही. 192 देशांच्या वसुंधरा परिषदेला दिलेली वचने पाळत नाही,' अशी टीका करून पुरावेही दिले. विशेष म्हणजे तिथल्या खासदारांनी तिचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. या वेळी पर्यावरणमंत्र्यांनी "आम्ही कमी पडलो आहोत' अशी जाहीर कबुली दिली. ग्रेटाच्या व्याख्यानानंतर अवघ्या आठ दिवसांत ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांनी "राष्ट्रीय पर्यावरण आणीबाणी' जाहीर केली हे विशेष. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students closed down the school to save the environment