विद्यार्थ्यांनी असा लुटला बोटिंगचा आनंद

विद्यार्थ्यांनी असा लुटला बोटिंगचा आनंद

वाळूज (सोलापूर) : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भोगावती नदी जलाशयातील होडीतून बोटिंग सफरीचा गोवा आणि कोकणसहलीसारखा अनुभव घेतला. 
वाळूज (दे.) येथील भोगावती-नागझरी नद्यांच्या संगमावरील विशाल जलाशय, नदीकिनारी असलेले 94 एकरावरील जंगल आणि किनाऱ्यालगतच्या झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट हे सारं कोकणासारखं दृश्‍य होडीतून पाहताना येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हरकून गेले होते. निमित्त होतं येथील जीवनदायिनी असलेल्या भोगावती नदीतील विद्यार्थ्यांच्या होडीमधील सफरीचं.

शिक्षिका सीमा तुळजापुरे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी सर्वजण चालत नदीकाठी आले. 20 विद्यार्थ्यांच्या गटागटाने होडीत बसवले. ज्ञानेश्‍वर कादे यांच्यासह येणाऱ्या-जाणाऱ्या गावकऱ्यांनी आम्हाला मदत केली. होडीत बसून पाण्यातून फेरफटका मारताना मुलांना खूप आनंद झाला. आपलीही शाळा नदीच्या पलीकडे असायला हवी होती म्हणजे आपण रोज शाळेला जाताना आणि येताना होडीत बसण्याचा आनंद घेतला असता, असे मुले म्हणत होती. एकूण 109 पैकी 56 विद्यार्थी यात सहभागी झाले होते.

मुख्याध्यापक हणमंत कादे, शिक्षक नितीन गुंड, सत्वशीला यादव, सीमा तुळजापुरे यांनी विद्यार्थ्यांच्या नदीमधील होडीतील सफरीसाठी पुढाकार घेतला. गेल्या सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच देगाव (वा.) येथील बंधाऱ्याची दारे टाकल्याने नदीत एवढं पाणी आले आहे. पूर्वी वाळूज येथे मोहोळ-वैराग आणि वाळूज-सोलापूर रस्त्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात येथे 12-13 फूट पाणी असायचे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रवाशांना नदीपलीकडे जाण्या-येण्यासाठी दोन्ही ठिकाणी पावसाळ्यात होडी चालायची. नंतर वाळूज-वैराग रस्त्यावर मोठा पूल झाला. मात्र, वाळूज-सोलापूर रस्त्यावर अद्यापपर्यंत येथील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची बंधारा किंवा पूल व्हावा, अशी मागणी गेल्या 50-60 वर्षांपासून आहे. मात्र, अद्यापपर्यंत या मागणीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. 

नदीत पाणी आणि येण्या-जाण्यासाठी होडी आहे म्हटल्यावर विद्यार्थ्यांना होडीतून जलाशयाची सफर घडवून आणण्याची कल्पना सीमा तुळजापूरे यांनी मांडली. या छोट्या सहलीमुळे कोकणच्या सहलीचा आनंद मुलांना मिळाला. 
- हणमंत कादे, मुख्याध्यापक, वाळूज (दे.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com