राज्यातील 36 लाख विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

संतोष सिरसट
शनिवार, 30 जून 2018

आकडे बोलतात
- गणवेशास पात्र मुली : 24 लाख 44 हजार 718
- मंजूर रक्कम : 146 कोटी 68 लाख
- गणवेशास पात्र अनुसूचित जातीची मुले : तीन लाख 57 हजार 905
- मंजूर रक्कम : 21 कोटी 47 लाख
- गणवेशास पात्र अनुसूचित जमातीची मुले : चार लाख 65 हजार 593
- मंजूर रक्कम : 27 कोटी 93 लाख
- गणवेशास पात्र दारिद्य्र रेषेखालील मुले : तीन लाख 55 हजार 665
- मंजूर रक्कम : 21 कोटी 33 लाख

सोलापूर : यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 36 लाख 23 हजार 881 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी 217 कोटी 43 लाख रुपये मंजूर केले आहेत. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश दिले नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

यंदाच्या वर्षी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात झाला. त्यावेळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके व गणवेश वाटपाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त पुस्तकांचेच वाटप झाले होते. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशाबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. शासनाने यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्याचा निर्णय खूपच उशिरा घेतला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर होणार आहे.

शासनाने मागील वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला फारसे यश न मिळाल्यामुळे पुन्हा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणवेश खरेदी शाळा व्यवस्थापन समितीला करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याच्या संदर्भात मागील वर्षी अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारला आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या राज्यातील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले, दारिद्य्र रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहेत. एका लाभार्थ्याला 300 रुपयांप्रमाणे दोन गणवेषासाठी 600 रुपये मंजूर केले आहेत. हे गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करायचे आहेत.

आकडे बोलतात
- गणवेशास पात्र मुली : 24 लाख 44 हजार 718
- मंजूर रक्कम : 146 कोटी 68 लाख
- गणवेशास पात्र अनुसूचित जातीची मुले : तीन लाख 57 हजार 905
- मंजूर रक्कम : 21 कोटी 47 लाख
- गणवेशास पात्र अनुसूचित जमातीची मुले : चार लाख 65 हजार 593
- मंजूर रक्कम : 27 कोटी 93 लाख
- गणवेशास पात्र दारिद्य्र रेषेखालील मुले : तीन लाख 55 हजार 665
- मंजूर रक्कम : 21 कोटी 33 लाख

Web Title: students school uniform in Maharashtra