विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात मिळणार दूध भुकटी 

संतोष सिरसट 
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 200 ग्रॅमची प्रत्येकी तीन पाकिटे तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहेत. ही पाकिटे विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी दिली जातील. ते पाकीट विद्यार्थ्यांनी घरी नेल्यास पालकांनी आपल्या पाल्यांना त्या दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे.

सोलापूर - राज्यात अतिरिक्त होणाऱ्या दुधावर तोडगा काढण्यासाठी शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यात पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविली जाणार आहे. एका विद्यार्थ्याला एका महिन्यासाठी 200 ग्रॅमचे दूध भुकटीचे एक पाकीट देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 200 ग्रॅमची प्रत्येकी तीन पाकिटे तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहेत. ही पाकिटे विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी दिली जातील. ते पाकीट विद्यार्थ्यांनी घरी नेल्यास पालकांनी आपल्या पाल्यांना त्या दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. ही पाकिटे शाळेने एकाच दिवशी वाटप करायची आहे. त्यासाठी 'दूध भुकटी वाटप दिवस' निश्‍चित करायचा आहे. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत एका विद्यार्थ्याला तीन पाकिटे द्यायची आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांना दूध भुकटीपासून दूध कसे तयार करावे याबाबतचे प्रशिक्षण पाकिटे वाटण्याच्या दिवशी द्यायचे आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील पोषण आहारामध्ये दूध भुकटीची पाकिटे केवळ प्रायोगिक तत्त्वावर म्हणून तीन महिने दिली जाणार आहेत. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी दूध भुकटी ही महाराष्ट्रातच तयार झालेली असावी. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये वित्त, नियोजन, उद्योग, दुग्ध व्यवसाय, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांचा समावेश आहे. 
 

Web Title: Students will get milk powder in school nutrition plan