वाइल्डलाइफ फोटोग्राफीसाठी स्मृतीवन उद्यानात स्टुडिओ 

परशुराम कोकणे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

सोलापूर : संभाजी तलाव शेजारचे स्मृती वन उद्यान मोर, किंगफिशर, हुदहुद, सातभाई यासह अनेक पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. आता येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यास स्वतंत्र स्टुडिओची उभारणी करण्यात येणार आहे. 

सोलापूर : संभाजी तलाव शेजारचे स्मृती वन उद्यान मोर, किंगफिशर, हुदहुद, सातभाई यासह अनेक पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. आता येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यास स्वतंत्र स्टुडिओची उभारणी करण्यात येणार आहे. 

सोलापुरातील वाइल्डलाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यास स्मृती वन उद्यानात स्टुडिओ उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कर्नाटकातील दांडेली आणि अन्य पक्षी अभयारण्य परिसरात पशु-पक्ष्यांच्या फोटोग्राफीसाठी स्वतंत्र फोटो स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. पशु-पक्ष्यांना कसलाही त्रास न होता फोटोग्राफीचा आनंद घेता यावा यासाठी स्टुडिओची गरज आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने यांनी याकरिता सकारात्मकता दर्शविली आहे. विभागीय वनाधिकारी माने यांच्याकडे पदभार आल्यापासून स्मृती वन उद्यान परिसरात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांच्याच पुढाकारातून बंद असलेल्या अवकाश निरीक्षण गृहाला पुन्हा सुरवात करण्यात येत आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे दिसत आहे. 

स्मृतीवन उद्यानात अनेक पक्षी दिसतात. पशु-पक्ष्यांच्या फोटोग्राफीसाठी स्मृतीवन उद्यानात झोपडीसारखा फोटो स्टुडिओ करण्यात येणार आहे. झोपडीला खिडकी करण्यात येईल. खिडकीतून पक्ष्यांची फोटोग्राफी करता येईल. 
- सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण 

सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन आहे. संभाजी तलाव आणि स्मृतीवन उद्यान परिसरात अनेक पक्षी दिसतात. पक्ष्यांची फोटोग्राफी करता यावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे फोटो स्टुडिओचा प्रस्ताव मांडला आहे. 
- डॉ. व्यंकटेश मेतन, वाइल्डलाइफ फोटोग्राफर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: studio at Smriti Garden for wildlife photography