वर्चस्ववादातून सुभाष बुवा यांचा खून

वर्चस्ववादातून सुभाष बुवा यांचा खून

सांगली - सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर) यांचा खून वर्चस्ववादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान बंडुलाल शेख (२४, रा. आक्‍सा मशिदीजवळ, संजयनगर) आणि रफिक बबलू शेख (३०, रा. हडको कॉलनी, सूर्यनगर) या दोघांना गुंडाविरोधी पथकाने अटक केली असून,  तीन भाऊ पसार आहेत. अमिर मोहिद्दीन आलमेल, बबलू मोहिद्दीन आलमेल, सय्यद मोहिद्दीन आलमेल अशी त्यांची नावे आहेत. 
दरम्यान, महापालिका निवडणुकीपासून वाद धुमसत होता. मृत सुभाष यांचा मुलगा प्रीतमने संजयनगर पोलिस ठाण्यात 
फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुवा हे संजयनगरमधील निरंकार कॉलनीत राहतात. अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात आहेत. त्यांचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. इम्रान आणि रफिक शेख हे बुवा यांच्या घराजवळच राहतात. दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने बुवा आणि शेख यांच्यात वाद होता. महापालिका निवडणुकीपूर्वीही त्यांच्यात वाद झाला. त्यावेळपासून हा वाद धुमसत होता.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बुवा यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यातील काही संशयितांना पोलिसांनी बोलावून घेतले. त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला होता. मात्र, टोळीत बुवा यांच्याविषयी वर्चस्ववाद सुरू झाला. त्यामुळे त्यांचा काटा काढण्याचे नियोजन झाले. 

शनिवारी रात्री नऊच्या सुमारास बुवा यांना रफिक शेख याचा फोन आला होता. त्याने देवकुळे हॉस्पिटलजवळील सूर्यनगर कॉलनीत बुवा यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत आणखी चारजण होते. पूर्वीच्या कारणातूनच पुन्हा वाद झाला. साऱ्यांनी मिळून बुवा यांच्यावर हल्ला चढवला. त्यात वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. 

गुंडाविरोधी पथकाचे उपनिरीक्षक शरद माळी यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्तीवर होते. सांगली-मिरज रस्त्यावरील मारुती मंदिर ते सूत गिरणी रस्त्यावर रफिक आणि इम्रान असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. 

२४ वार... 
पाच हल्लेखोरांनी सुभाष बुवा यांच्यावर कुऱ्हाड, कुकरीने हल्ला चढवला. डोक्‍यात, पाठीत, पोटात तब्बल २४ वार करण्यात आले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. संशयितांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नदाफ गॅंगशी संबंध
पोलिसांच्या ताब्यातील इम्रान आणि रफिक शेख हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. इम्रान शेखवर खुनाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत; तर रफिकवर घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यांच्या टोळीचे म्हमद्या नदाफ गॅंगशी संबंध होते, असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com