कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा जपणारे टुमदार घर आहे तरी कसे ?

सुधाकर काशीद
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

कंदील ही देखील कालबाह्य झालेली एक घरातील वस्तू,पण नागेशकरांनी डौलदार आकार असलेले जुने कंदील जमवले आणि या दिव्यांना त्यांनी दिवाणखान्यात मानाचे स्थान दिले. हे दिवे जुने, पण त्यांनी घराच्या दिवाणखान्याला नवे सौंदर्य मिळवून दिले. 

साईक्‍स एक्‍स्टेंशन परिसर म्हणजे, पटणार नाही. एकेकाळी एक एक प्लॉट दोन दोन एकरांचा. दत्तवाडकर घोरपडे, व्ही. टी. पाटील, रणजित देसाई, लीला पाटील, महागावकर, जाधव, गणितज्ञ मुर्डेश्‍वर, पवार, इथापे, भूमकर, बेनाडीकर अशी एकाहून एक दिग्गजांची निवासस्थाने. अशा चौफेर वातावरणात एकच छोटंसं टुमदार घर. हे घर नागेशकरांचे आणि घराचे नावही ‘घर नागेशकरांचे’. अशा या घराने घरपण जपलेच आहे; पण या घराने कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा जपली आहे.  

सतारवादन, हार्मोनियम, गिटार, तबला, बासरीवादनातील कलाकारांसाठी हे घर म्हणजे एक खुले व्यासपीठ आहे. या कौलारू घराच्या अंगणात आपली कला सादर करण्याची संधी म्हणजे कलाकारांचा गौरव मानण्याची परंपरा आहे.

या घरात सुभाष नागेशकर राहतात. या घराला साजेसेच असे हे व्यक्तिमत्त्व. त्यांनी या घराला आपल्या कल्पनेप्रमाणे डौल दिला. जुन्या राजवाड्याजवळ जिथे आज डॉ. संघवींचा दवाखाना आहे. तेथे आप्पा पंडितांचा वाडा होता. हा वाडा पाडला त्यावेळी त्या वाड्याची भंगारात घातली जाणारी चौकट नागेशकरांनी आणली व घराच्या अंगणात एका बाजूला उभी केली. कंदील हीदेखील कालबाह्य झालेली एक घरातील वस्तू,पण नागेशकरांनी डौलदार आकार असलेले जुने कंदील जमवले आणि या दिव्यांना त्यांनी दिवाणखान्यात मानाचे स्थान दिले. हे दिवे जुने, पण त्यांनी घराच्या दिवाणखान्याला नवे सौंदर्य मिळवून दिले. 

नागेशकरांनी घराचा व्हरांडा मोकळाच ठेवला. त्यात बैठक केली. दोन दगडी मूर्ती कोनाड्यात ठेवल्या. अंगणात जुन्या मंदिराचे भग्न खांब आणून उभे केले आणि अंगणाला देखणेपण मिळवून दिले. नागेशकरांच्या घरातील सजावट म्हणायला खूप साधी; पण खूपच देखणी. त्यांनी स्वयंपाकघरात जाणीवपूर्वक पितळेचेच डबे वापरले व एका रांगेत फडताळात ठेवलेले पितळेचे डबे स्वयंपाकघराचा चेहरामोहराच बदलून गेले. 

नागेशकरांच्या घराची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, हे घर नवोदित कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ. या घरात कवी ग्रेस यांनी कवितावाचन केले. केशव डिगेंच्या बासरीची धून या घरात भरुन राहिली. कॅनडाच्या पीटर रिझवॅकने या घरात पियानोही वाजवला. नूतन गंधर्व माला पाथरे, समीर डुबले यांचे गायन या घराच्या अंगणात रंगले. आता साईक्‍स एक्‍स्टेंशन म्हणजे, बहुमजली इमारतीचा परिसर झाला आहे. त्यामुळे त्या तुलनेत तर नागेशकरांचे घर खूप छोटे जाणवत आहे; पण ज्यावेळी आपण हे छोटे घर पाहतो, तेव्हाच त्याचे मोठेपण ध्यानात येते.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subhash Nageshkar Special House in Kolhapur