स्वनिष्ठा हीच ऊर्जा - सुबोध भावे

स्वनिष्ठा हीच ऊर्जा - सुबोध भावे

कोल्हापूर - ‘भोवतालातून किंवा दुसऱ्यांकडून आपल्याला जरूर ऊर्जा मिळते; पण ती कायम आपल्यासोबतच राहील, याची शाश्‍वती नसते. आपल्याला जे आवडतं, ते काम झपाटून करावं. यश-अपयशाची चर्चा जरूर होईल. पण, स्वतःवरील आणि हातात घेतलेल्या कामाविषयीची निष्ठा हीच खरी ऊर्जा असते,’’ असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी येथे व्यक्त केले.

संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. दरम्यान, यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात उत्स्फूर्त गर्दी झाली. ‘सकाळ’ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने सलग चार दिवस ही मालिका रंगणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल.
सुबोध भावे आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, सूत्रसंचालक, गायक आणि त्यापलीकडे जाऊन एक जिंदादिल माणूसही. साहजिकच संवादातून प्रत्येक पैलू उलगडत गेला. 

मिलिंद कुलकर्णी यांनी हा संवाद आणखी खुलवला. ‘अभिनयाकडे ठरवून आलात की अपघाताने,’ या प्रश्‍नाने सुरू झालेला हा संवाद पुढे तब्बल शंभर मिनिटं साऱ्यांनाच एका रंजक प्रवासात घेऊन गेला. सुबोध भावे म्हणाले, ‘‘करीअरचा विचार करत असताना कधी पोलिस अधिकारी, कधी एखादा व्यावसायिक तर कधी ‘एमबीए’ असा गोंधळ मनात होता. पण, अभिनयात आलो आणि एकाच आयुष्यात अनेकांच्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. सुरवातीच्या काळात नाटकातून काढून टाकलं. ‘बाल शिवाजी’ नाटकात तब्बल सतरा भूमिका केल्या; पण एकाच ओळीचा संवाद होता. मात्र, मुख्य व्यक्तिरेखा मिळाली नाही म्हणून थांबलो नाही; तर नाटकाच्या इतर सर्व तांत्रिक बाजूंचा अभ्यास केला आणि त्या यशस्वीपणे हाताळल्या. त्याचाच फायदा पुढे एकूणच करीअरसाठी झाला.’’

‘चंद्रपूरच्या जंगलात’ हे खरं तर प्रायोगिक नाटक. त्याच्या निर्मितीची प्रक्रियाही मोठी रंजक आहे. मात्र, पुढे या नाटकाचे सर्वत्र प्रयोग केले आणि त्यातून विचारांची दिशा पक्की झाली. चांगला विषय असला, तर तो नक्कीच लोकांना आवडतो, हा आत्मविश्‍वास वाढला. पुण्यातून मुंबईला गेल्यानंतर स्थिर व्हायला थोडा वेळ जरूर गेला. पण, तो अनुभवही नव्याने बऱ्याच गोष्टी शिकवणारा होता, असेही ते म्हणाले. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ‘‘प्रत्येकात सळसळती ऊर्जा पेरणारा हा उपक्रम असून, शिवाजी विद्यापीठाचा त्यात सक्रिय सहभाग आहे. सुबोध भावे यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वं नव्या पिढीला अशा उपक्रमांतून भेटतात आणि ती सर्वांसाठीच दिशादर्शक ठरतात.’’

‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम होत असून, त्याला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. भिंतींच्या आतील शिक्षणापेक्षाही भिंतींबाहेरील शिक्षण खऱ्या अर्थाने जगणं समृद्ध करीत असते. आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्ती ‘ऊर्जा’तून भेटतात आणि त्या सर्वांनाच नवी प्रेरणा देऊन जातात.’’ 

यावेळी ‘सकाळ माध्यम समूहा’चे सीईओ उदय जाधव, ‘सकाळ’चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, तनिष्क शोरूमचे प्रसाद कामत, जय कामत, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे डॉ. भरत खराटे, मार्व्हलस इंजिनीअर्सचे संग्राम पाटील, क्‍लायमॅक्‍स ॲडव्हर्टाझर्सचे उदय जोशी, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी उपस्थित होते. 

सुबोध भावे सांगतात...

  • लहानपणी आपण पडतो आणि जखम होते, त्या वेळी सर्वाधिक आनंद होतो. मात्र, पुढे यशाच्या मृगजळामागे धावताना तो आनंद विसरतो. मुळात अपयश हेच खरे यश असते. कारण ते आपल्याला सतत जागं आणि जिवंत ठेवते.
  • जेवणातील लोणच्याएवढचं महत्त्व स्पर्धेला असतं. खरी स्पर्धा आपली आपल्याशीच असावी.
  • मेहनतीला ‘ऑप्शन’ नाही. व्यायाम ही अशी गोष्ट, की ती आपली आपल्यालाच करावी लागते.
  • खासगी आयुष्य आणि काम या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या वेगळ्याच ठेवायला हव्यात.
  • अंधारातूनही एखादा झरोका आपल्याला प्रकाश देत असतो. त्याकडे सकारात्मकतेने पाहूनच नेटानं पुन्हा उभारायला हवं.  
  • परीक्षेतील गुणांवर आधारित यशाची व्याख्या नक्कीच चुकीचीच. मुळात यश-अपयशापेक्षा आपण नेमकं ध्येय काय ठेवतो आणि त्यासाठी मेहनत कशी घेतो, या गोष्टींना अधिक महत्त्व असते.

आम्ही असू लाडके...
‘आम्ही असू लाडके’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरातीलच चेतना विकास मंदिर शाळेत झाले. या चित्रपटातील एक प्रार्थना शौनक अभिषेकी यांनी गायिली आहे. त्यानिमित्ताने त्यांची आणि जितेंद्र अभिषेकी यांची ओळख झाली. त्यानंतर शास्त्रीय संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपल्याला नेमकं काय आणि कशासाठी करायचं आहे, याची जाणीव देणारा हाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. पुढे मग ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य’, ‘काशिनाथ घाणेकर’ आदी चित्रपट पड्यावर आले आणि ते प्रेक्षकांना भावले. 

नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाने नवी पिढी शास्त्रीय संगीताकडे वळली, असे सांगून सुबोध भावे म्हणाले, 
‘‘पुढे ‘बालगंधर्व’च्या निमित्तानं वेगळा अनुभव घेता आला. बाईची भूमिका करण्यासाठी तब्बल २२ किलोग्रॅम वजन कमी केलं. सत्तावीस वारी साडी नेसायला लागायची आणि तिचे वजन तब्बल सोळा किलो होते. चित्रीकरणासाठी खरेखुरे दागिने वापरले. त्याची किंमत तीन ते पाच कोटींपर्यंत होती.’’ एकूणच ‘तुला पाहते रे’ मालिकेतील विक्रांत सरंजामेंपर्यंतचा प्रवासही त्यांनी उलगडला. मंगेश पाडगावकरांच्या कवितेने संवादाची सांगता झाली.  

- प्रायोजक असे... 
टायटल स्पॉन्सर - संजय घोडावत ग्रुप स्टार एअर 
सहप्रायोजक - तनिष्क शोरूम, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मार्व्हलस इंजिनीअर्स 
हॉस्पिटॅलिटी पार्टनर - हॉटेल सयाजी 
ट्रॅव्हल पार्टनर - मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रा. लि. 
फर्निचर पार्टनर - लकी फर्निचर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com