बाळाला एचआयव्हीमुक्त ठेवण्यात यश

अमृता जोशी
रविवार, 23 एप्रिल 2017

सीपीआरच्या ‘पीपीटीसीटी’चा आदर्श; आठ वर्षांत सात हजार बालकांना वाचवले
कोल्हापूर - पीपीटीसीटी (पालकांकडून अपत्याकडे एचआयव्हीचा प्रसार टाळण्यासाठी योजना)च्या माध्यमातून येथील सीपीआरच्या प्रसूती विभागाला आठ वर्षांत आईकडून बाळाला होणाऱ्या एचआयव्ही संसर्गापासून सात हजार बालकांना वाचविण्यात यश आले आहे. याअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे मातेकडून अर्भकाला होणाऱ्या एचआयव्हीच्या संसर्गाचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांच्या खाली आले आहे.

राज्यात पीपीटीसीटी लागू झाल्यापासून एडस्‌बाबत जनजागृती, पालकांचे समुपदेशन तसेच उपचारांची शासकीय रुग्णालयांमध्ये अधिकृत सुरवात झाली. या विषयावर उघडपणे बोलले जात नसल्यामुळे शासकीय रुग्णालयांसमोर आणि त्यातही स्त्री-रोग व प्रसूती विभागासमोर मोठे आव्हान होते. ते यशस्वीपणे पेलत सीपीआरच्या प्रसूती विभागाला २००९ पासून सात हजार अर्भकांना एचआयव्हीबाधित मातेकडून होणारा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. ही योजना राबविण्यापूर्वी कोणत्याही उपाय व उपचारांशिवाय नैसर्गिक गर्भधारणा व प्रसूतीदरम्यान एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाण २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत होते. उपचारांमुळे ते आता पाच टक्क्यांहून कमी करण्यात यश मिळाले आहे.  

योजना लागू झाल्यापासून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गर्भवती मातेपासून जन्माला येणाऱ्या बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून औषधोपचार, सिझेरियन प्रसूती व बाळाला मातेचे स्तनपान करू न देणे असे उपाय अंवलबले जातात.

यातील एक-दोन किंवा तीनही मार्ग अवलंबले जातात. साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या मातांना बाळाच्या जन्मानंतर बाळासाठी योग्य पोषण आहार आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. त्यामुळे स्तनपान करू देण्याखेरीज पर्याय राहत नाही. यामुळे अडथळे आले असले तरी मातांकडून स्वतःहून एचआयव्हीबाधित असल्याचे सांगण्याचे, स्वतःहून औषधोपचार मागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे होणाऱ्या बालकाला एचआयव्ही संसर्ग होण्यापासून वाचविण्यासाठी उपाय करणे सोपे झाले आहे. हे समुपदेशन, जनजागृतीचे मोठे यश म्हणता येईल. या व्यतिरिक्त तरुणांचे, एचआयव्हीबाधितांचे समुपदेशन मोठ्या प्रमाणात होण्याची गरज असल्याचे मत सीपीआरच्या प्रसूती विभागप्रमुख डॉ. एस. डी. शानभाग यांनी व्यक्त केले आहे.

भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांमध्ये जागरूकता कमी आहे. त्यामुळे आपण एचआयव्हीग्रस्त असल्याचे माहीत असतानाही प्रतिबंधांचा वापर केला जात नाही. यामुळे प्रौढांमध्ये असुरक्षित लैंगिक संबंधांमधून एचआयव्ही होण्याचे प्रमाण मोठे आहे, यासाठी लोकशिक्षण आवश्‍यक आहे.
- डॉ. एस. डी. शानभाग, सीपीआर

Web Title: Success in keeping the baby free of HIV