MPSC : परिस्थितीवर मात करून ध्येयाला गवसणी

MPSC : परिस्थितीवर मात करून ध्येयाला गवसणी

कोल्हापूर - जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे फौजदार परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे. कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्‍य नसते, असा संदेशच जणू त्यांनी आपल्या यशातून दिला आहे. 

महिला दिनी मिळाले मोठे यश 
आरती सुरेश पिंगळे (कसबा बावडा) ः महिला दिनाला निकाल जाहीर होऊन मिळालेले यश मोठे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या आरतीचे वडील सुरेश पिंगळे हे ‘एमआयडीसी’मध्ये वॉचमनचे काम करतात. तिने विवेकानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर डी. एड. केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून तिने कला शाखेची पदवी, तर मराठीतून एम. ए. ची पदव्युत्तर पदवी मिळविली. ती विद्यापीठात सुवर्णपदक विजेती ठरली. ती २०१५ मध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संरक्षण अधिकारी पदावर रुजू झाली. नोकरी करताना वेळ मिळेल तसा अभ्यास करीत तिने परीक्षेत यश मिळविले. सेल्फ स्टडीवरच भर ठेवला. आई सुनीता या गृहिणी असून, कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच यशस्वी होऊ शकल्याचे व वर्ग एक अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले. 

पहिल्या प्रयत्नात यश हातात
अक्षय दिलीप सरवदे (हुपरी) ः रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या कामगाराच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदावर राज्यात ३१ वी रॅंक मिळवली. अक्षयने हे यश मिळविले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. हुपरी येथील दिलीप सरवदे कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर मजुरी करतात. त्यांची पत्नी गृहिणी आहे; तर मोठा मुलगा शेअर मार्केटचे काम करतो. लहान मुलगा अक्षय याने पदवीपर्यंतचे शिक्षण शहाजी महाविद्यालयातून घेतले. यानंतर येथूनच ‘बीसीए’चे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती फारशी चांगली नसताना त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब खर्डेकर वाचनालयात सहकाऱ्यांच्या साथीने त्याने जोमाने अभ्यास सुरू केला व अवघ्या नऊ महिन्यांत अभ्यास करून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी सामोरा गेला. पहिल्याच प्रयत्नात त्याने मिळविलेले हे यश कौतुकाचा विषय ठरले आहे. 

हेल्पर ते फौजदार
शरद माने (पिंपळगाव, ता. कागल) ः कागल तालुक्‍यातील पिंपळगावच्या शरदने फौजदार परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळविला. वडील बसचालक, आई गृहिणी आहे. शिक्षणात मध्यम असलेल्या शरदला दहावीच्या परीक्षेत ४३ टक्‍के गुण मिळाले होते. मात्र, फौजदार होण्याची त्याची जिद्द होती. कुटुंबावर भार न टाकता त्याने अभ्यास सुरू ठेवला. तसेच, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी साखर कारखान्यात हेल्पर म्हणून कामही सुरू केले. मात्र, परीक्षा जवळ आल्यानंतर आई-वडिलांनी त्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुणे येथे त्यांनी सेल्फ स्टडी केली. दरम्यानच्या काळात त्याने लग्न केले. एका बाजूला अभ्यास, दुसऱ्या बाजूला संसार करीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शरदने फौजदार परीक्षेत यंदा बाजी मारली. गेल्या महिन्यातच त्याला मुलगा झाला. आई-वडिलांचे कष्ट व पत्नीचे सहकार्य यामुळेच ‘एमपीएससी’त लखलखीत यश मिळाल्याची भावना शरदने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली. कमी गुण असले तरी जिद्द सोडू नका, यश तुमचेच आहे, असा सल्लाही त्याने या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना दिला.

जिद्द हवी यश मिळतेच
सुमित कल्लाप्पा खोत (देवरूख, जि. रत्नागिरी) ः सुमीतने बी.एस्सी. ॲग्रीकल्चरमधून पदवी घेतली. तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयात शिकायला होता. त्याने दहावीत ८७.३८, तर बारावीला विज्ञान शाखेतून ७२ टक्के गुण मिळविले. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्यात काहीही अशक्‍य नसते. फक्त करण्याची जिद्द असेल, तर यश मिळविता येते, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. 

रोज दहा तास अभ्यास
अमोल हरिदास माने (मंगळवेढा, सोलापूर) ः अमोलने इंग्लिश स्कूलमधून दहावी, तर नंतर बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्याने बी.ए., बी.एड.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर २०१३ मध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात सुरवात केली. अजिंक्‍य आजगेकर व दीपक ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने रोज आठ ते दहा तास अभ्यास केला. त्याचे वडील आर्मीत आहेत. आई गृहिणी असून, भाऊ शेती करतो.

आईच्या कष्टाचे चीज
दयानंद अशोक पाटील (कडाल, ता. गडहिंग्लज) ः दयानंदची आई चंदाबाई यांनी शेती करीत मुलाचे ‘पीएसआय’चे स्वप्न पूर्ण केले. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण महागावमधील शिवाजी विद्यालयात झाले. त्याने शिवराज महाविद्यालयातून बी.एस्सी. फिजिक्‍समधून पदवी घेतली. त्याने चौथ्या प्रयत्नात यश मिळविले. आईच्या पाठिंब्याने व हेमंत कलोळे यांच्या मार्गदर्शनामुळेच यशस्वी झाल्याचे त्याने सांगितले. 

तिसऱ्या प्रयत्नाने यश
योगेश आनंदा खैरावकर (कवठेमहांकाळ, जि. सांगली) ः योगेशने गावातील श्रीमहाकाली हायस्कूलमधून दहावी, तर पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळविल्यानंतर त्याने २०१२ मध्ये अभ्यासास सुरवात केली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. 

अपयशाने न खचता केले प्रयत्न
शशिकांत दत्तात्रय पाटील (शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी) ः शशिकांतचे दहावीपर्यंत शिक्षण माध्यमिक विद्यालयात झाले. महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने सरूड येथील शाहू महाविद्यालयातून कला शाखेची पदवी मिळवली. ‘इन्फोसिस’मध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासास सुरवात केली. मामा पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय पाटील व मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, भाऊ तहसीलदार सूर्यकांत पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत त्याने अभ्यासाचा जोर वाढविला. त्याला चौथ्या प्रयत्नात यश मिळाले. तो म्हणाला, ‘या आधीच्या अपयशाने मी खचून गेलो नाही. सातत्यपूर्ण अभ्यास हेच माझ्या यशाचे गमक ठरले.’
सातत्याच्या 

प्रयत्नांना यश
सोमनाथ हरी जाधव (उचगाव) ः सोमनाथने एम.एस्सी. ॲग्रो केमिकल पेस्ट मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. फौजदार परीक्षेत पहिल्या प्रयत्नात तो अंतिम परीक्षेत अयशस्वी ठरला होता. दुसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळविले. रोज पाच ते सहा तास अभ्यास करीत यश मिळविल्याचे त्याने स्पष्ट केले. 

पहिल्याच प्रयत्नात यश

इंद्रजित मारुती चव्हाण (कासारपुतळे, ता. राधानगरी) ः इंद्रजितने जे. जे. मगदूम कॉलेजमधून बी. ई. मेकॅनिकलची पदवी मिळवली. त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याचे वडील प्राचार्य असून, आई गृहिणी आहे. सरदार भित्तम यांच्याकडे शारीरिक तयारी केल्याचा फायदा झाल्याचे त्याने सांगितले. 

स्वयंअध्ययनातून यश
विनायक शिवाजी फराकटे (कासारवाडा, ता. राधानगरी) ः विनायकने शाहू हायस्कूलमधून दहावीला ७६.१३, तर बारावीला विज्ञान शाखेतून ५० टक्के  गुण मिळविले. त्यानंतर त्याने बी. ई.ची पदवी घेतली. त्याने २०१५ पासून स्वयंअध्ययन करीत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. त्याची आई अंगणवाडी सेविका, तर वडील आयटीआय शिक्षक आहेत. 

वडील, भावाचे स्वप्न साकारले
रेश्‍मा नामदेव पाटील (कोरिवडे-पेरणोली, ता. आजरा) ः रेश्‍मा नऊ वर्षांची असतानाच आईचे छत्र हरपले. त्यानंतर वडील नामदेवराव पाटील यांनी शेती करीत आणि भाऊ आनंदा पाटील याने खासगी दुकानात नोकरी करीत तिच्या शिक्षणाला पाठबळ दिले. २०१५ पासून ती ही परीक्षा देत होती. त्यानंतर आज हे स्वप्न साकार झाल्याचा तिला आनंद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com