#NewYearMotivition : वडिलाने गमावले, मुलाने सन्मानाने मिळवले

#NewYearMotivition : वडिलाने गमावले, मुलाने सन्मानाने मिळवले


सोलापूर : संतापाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे वडिलांने पोलिसाची वर्दी गमावली, मात्र 16 वर्षांच्या तपश्चर्येनंतर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक होऊन मुलाने तीच वर्दी पुन्हा सन्मानाने मिळवली. ही संघर्षमय यशोगाथा आहे 
पाटखळ (ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) येथील रहिवासी असलेल्या रणजीत कोळेकर या युवकाची. 

सोळा वर्षांपूर्वीची धक्कादायक घटना
रणजीत यांचे वडील धुळा कोळेकर हे पंढरपूरात कर्तव्यावर होते. काही कारणावरून धुळा कोळेकर यांनी तालुका न्यायालयाच्या आवारातच पोलिसांवर गोळीबार केला, त्या घटनेत तीनजण जखमी, तर दोनजण ठार झाले. या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरला. या गुन्ह्याप्रकरणी धुळा यांना 16 वर्षांचा कारावास झाला. घटना झाली त्यावेळी रणजीत दुसरीत शिकत होता. 

आईने उचलले शिवधनुष्य
पतीच्या कृत्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले. गुन्हेगाराची मुले म्हणून लोक मुलांना हिणवू लागले. अशावेळी धुळा यांच्या पत्नी संगीता यांनी जबाबदारीचे शिवधनुष्य उचलले. राहूल, रोहित व रणजीत या तीन मुलांसह आनंदाने जीवन जगत असलेल्या कोळेकर कुटुंबियांचे या घटनेनंतर हाल सुरु झाले. आर्थिक स्थिती बिघडली. संगीता यांनी पदरी असलेले सोनं विकले, जमीन विकली, पैसे कमी पडू लागल्याने त्या दुसऱ्याच्या शेतात राबू लागल्या. रणजीतचा मोठा भाऊ मेडीकलच्या दुकानात कामाला जाऊ लागला. मिळालेल्या पैशातून ते कसेबसे घर चालवू लागले.

दहावीत मिळाले उल्लेखनीय यश
लहानपणापासूनच हुशार असलेल्या रणजीतला दहावीच्या परिक्षेत 87 टक्के गुण मिळवले. भविष्यात हा मुलगा काहीतरी निश्चित चांगले नाव कमविणार याची खात्री आई आणि भावाला होती. त्यामुळे त्यांनी रणजीतच्या शिक्षणाला काही कमी पडू दिले नाही. पाटखळ येथील जिल्हा परिषद शाळा, मदनसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयातून बी.एसस्सी. गणित या विषयातून त्याने पदवी घेतली.

स्पर्धा परिक्षेचा घेतला ध्यास
पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्यासाठी रणजीतने पुणे गाठले. रात्रीचा दिवस केला.  या इराद्याने रोज ७-८ तास अभ्यास करुन त्यात सातत्य ठेवले. मनाशी विजयाची खूणगाठ बांधली. याच दरम्यान रणजित एम.टी.एस. झाला. नंतर तो आणि त्याचा भाऊ पालघरमध्ये पोलीस झाले. बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने त्याने ती नोकरी स्वीकारली नाही. स्पर्धा परिक्षेतून उत्तुंग यश मिळवलेले बुद्धजय भालशंकर,महादेव कारंडे व  उमेश नंदागवळी यांच्याकडून यशाचा कानमंत्र घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१७ मध्ये रणजीतने लेखी परीक्षा दिली. जून  २०१८ मध्ये निकाल लागला आणि केलेल्या कष्टाचे चीज झाले. 

संकटांना भेदत केले यशाला जवळ
अथक परिश्रम, दृढनिश्चय,बुद्धिचातुर्याच्या जोरावर संकटांना भेदत रणजीतने यशाला जवळ केले. रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे वडिलाने नाव आणि वर्दी गमावली होती, ती मुलाने अथक परिश्रम करून मिळवल्याबद्दल रणजीतचे सर्वत्र कौतुक होत आहे. काल झालेल्या दीक्षांत समारंभात रणजीतला गणवेशात पाहिल्यावर तसेच त्याचे बॅच लावताना कुटुंबियांना गहिवरून आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com