एक एकर सीताफळातून 4 लाखाचे उत्पन्न

आण्णास काळे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

- केम (ता. करमाळा) येथील अरुण तुकाराम तळेकर यांचा प्रयोग 
- शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती झाल्यानंतर माळरानावर फुलवली सीताफळाची बाग 
- आणखी चार एकर सीताफळाची लावली बाग 
- दुष्काळात टॅंकरने पाणी घालून जगवली झाडे

करमाळा : केम (ता. करमाळा जि. सोलापूर) येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक अरुण तुकाराम तळेकर यांनी माळरानावर सीताफळाची बाग फुलवली असून एक एकरातून 4 लाख चे उत्पन्न काढले आहे. एक एकर बागेचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आणखी चार एकर सीताफळाची बाग लावली आहे. विशेष म्हणजे स्वतः अरुण तळेकर हे बागेत काम करतात. गेल्यावर्षी दुष्काळात टॅंकरने झाला पाणी घालून ही झाडे जगवली आहे. 
अरुण तळेकर यांनी रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष सेवा केली आहे. वांगी (करमाळा), भोसे (पंढरपूर), सोलापूर येथे सेवा केली आहे. एकूण पाच एकर सीताफळाची बाग लावली असून पुढील वर्षी चार एकर बागेला फळे लागणार आहे. सेवानिवृत्त नंतर आपल्या वडिलोपार्जित पाच एकर माळरानावर सीताफळाची बाग लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी माळरानावरच विहीर खोदली. या विहिरीला थोडे पाणी लागले. याच पाण्याच्या जिवावर सुरवातीला 2015 साली त्यांनी एक एकर सीताफळाची बाग लावली. संपूर्ण बागेला ठिबक सिंचन केले आहे. 

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स बंद

एका एकरात 450 झाडे लावली आहेत. 15 बाय 7 वर एक झाड लावण्यात आले आहे.पाच एकरात 2200 झाडे त्यांनी लावली आहेत. तिस-या वर्षी सीताफळा फळे येण्यास सुरवात झाली आहे. दुष्काळी परिस्थिती ही त्यांनी टॅंकर ने विकत पाणी घातले आहे. सीताफळावर सहसा कोणताही रोग पडत नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न यातून मिळते. उन्हाळ्यात कमी पाणी असले तरी ही झाडे झळत नाहीत. अरुण तळेकर यांनी आदर्श पद्धतीने सीताफळाची बाग फुलवल्याने अनेक शेतकरी ही बाग पाहण्यासाठी येत आहे. 

120 रुपये दर 
सध्या सीताफळाला 120 रुपये पर्यंत दर मिळत असून 10 ते 15 किलोच्या बॉक्‍स मध्ये वाशी(मुंबई) येथे हे सीताफळ विक्रीसाठी पाठवत आहेत. 

भुसार शेती करण्यापेक्षा शेतक-यांनी फळबाग लागवड केली पाहिजे. कमी कष्टात चांगले उत्पन्न मिळते. सेवानिवृत्त झाल्यावर मी शेती करण्याचा निर्णय घेतला. माझी शेती माळरानावर आहे.माञ येथे सीताफळाची बाग लावली असून सध्या एक एकर बाग सुरू झाली आहे .आणखी चार एकर बाग पुढच्या वर्षी सुरू होईल. पाच एकर बागेतून वर्षाला कमीत कमी 18 ते 20 लाख उत्पन्न मिळू शकते. 
- अरुण तळेकर, सेवानिवृत्ती शिक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sucess story of dryland farmer