कुळाची कथा सांगायची आणि पोट भरण्यासाठी गावोगाव फिरायचं

निवास मोटे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

हेळवी समाज, गावोगावी जाऊन लोकांच्या कुळकथा सांगत आपलं पोट भरणारा... अनेक वर्षापासुन दुर्लक्षित आहे, त्यांची ही व्यथा...

कोल्हापूर - राहण्यासाठी त्यांना घरी नाही...कसायला जमीन नाही, पोटासाठी वर्षभर वणवण भटकावे लागते. त्यांच्या पाचवीला पुजलेली गरिबी. जग चंद्रावर गेले; पण हा हेळवी समाज अजूनही जमिनीवरच आहे. कोणत्याही शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचल्याच नाहीत. कुळकथा सांगणारे हेळवी कुटुंब आपली व्यथा मांडत होते. 

शेतकऱ्याला ऐकवतात त्याची कुळकथा

कर्नाटक, रायबाग, चिंचली (मायाक्का) या भागातील हेळवी कुटुंबांचा तांडा काल कुशिरे-पोहाळे या भागातील एका माळावर दाखल झाला. त्यांच्यासोबत नंदी बैल, बैलगाड्या, शेळ्या, कुत्री मांजर हाही परिवार होता. वर्षानुवर्षे हेळवी समाज पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करतो. हातकणंगले, शिरोळ, करवीर या तालुक्‍यांतून भटकंती करत पन्हाळा भागात कुळकथा सांगण्यासाठी हा समाज दाखल झाला आहे. या माळावर दोन दिवसांची विश्रांती घेऊन हा समाज कसबा ठाणे, पन्हाळा भागात दाखल होईल. मिळेल ते धान्य  घ्यायचे आणि तपुढे चालवायचे. त्या शेतकऱ्याला त्याची कुळकथा ऐकवायची. एक गाव झालं, की  पुन्हा दुसऱ्या गावात त्यांचे आगमन होते. त्या गावातच माळावर आपला संसार मांडायचा.

या समाजात परंपरेने त्यांना आलेली गावे करत हा समाज पावसाळ्यापर्यंत आपले कुळकथा सांगून पोट भरणार आहे. पावसाळ्यात तीन महिने तो आपल्या गावी परततो. हा समाज अगदी गरीब व विश्‍वासू, देईल ते घेणार. समाजाची कर्नाटक भागात ठिकठिकाणी छोटी घरे आहेत. काहींची तर घरेही नाहीत. कर्नाटक शासनाने त्यांना रेशनकार्ड आधारकार्ड दिले आहे; पण त्यांना कसल्याही सुविधा मिळत नाहीत. या समाजाची लहान मुले आता शाळेत जाऊ लागली आहेत. त्यांनी आपली मुले कुंभोज, पेठवडगाव, आष्टा, सांगली या भागातील आश्रमशाळांत घातली आहेत. आपली मुले शिकावीत म्हणून या समाजाने आता मुलांना शिक्षणासाठी शाळेत घातले आहे. वर्षातून एकदा त्यांना घरी नेले जाते. शिक्षणाचे महत्त्व त्यांना आता पटले आहे. या तांड्यांमध्ये दहावीपर्यंत शिकलेल्या संगीता हेळवी या भेटल्या, त्यांनी आपल्या समाजाच्या चालीरीती, गरिबी, तसेच इतरही व्यथा मांडल्या. 

 

 

 

आमची जात हेळव्याची. कुळाची कथा सांगायची आणि पोट भरण्यासाठी गावोगाव फिरायचे. शासनाकडून कोणत्याही प्रकारची आम्हांस मदत होत नाही. हक्काची घरे नाहीत, जमिनी नाहीत. 
- संगीता हेळवी, 
चिंचली, मायाक्का (कर्नाटक)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suffering of halvi community