साखर उद्योगापुढे अस्मानी संकट

प्रमोद बोडके
शनिवार, 20 जुलै 2019

सोलापूर : देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभा राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख 4 हजार हेक्‍टर उसापैकी 20 ते 30 टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्या अभावी ऊसाचे पाचरट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील 38 साखर कारखान्यांपैकी 32 कारखाने चालतात. यंदाच्या हंगामात 32 पैकी साधारणतः 22 कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर : देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभा राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख 4 हजार हेक्‍टर उसापैकी 20 ते 30 टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्या अभावी ऊसाचे पाचरट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील 38 साखर कारखान्यांपैकी 32 कारखाने चालतात. यंदाच्या हंगामात 32 पैकी साधारणतः 22 कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जुलै उजाडला तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात आडसाली उसाची 1 लाख 61 हजार हेक्‍टरवर लागण झाली होती. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्‍क्‍यांहून कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न कायम आहे. उत्तर सोलापूर व बार्शी तालुके वगळता इतर तालुक्‍यात आडसाली उसाची लागण झाली नाही. यंदा जिल्ह्यात 2 हजार 356 हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. उजनी धरण यंदा भरेल की नाही? याचीही शाश्‍वती नसल्याने नवीन लागण करण्याचे धाडस शेतकरी करताना दिसत नाही. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या अस्मानी संकटामुळे धोक्‍यात आला आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणात गाभा असलेला साखर उद्योगच दुष्काळामुळे अडचणीत आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आकडे बोलतात...
- यंदा गाळपासाठी असलेला असलेला ऊस : 1 लाख 4 हजार 86 हेक्‍टर
- जिल्ह्यातील एकूण साखर कारखाने : 38
- यंदा गाळप घेऊ शकणारे कारखाने : 10 ते 12
- साखर उद्योगाच्या माध्यमातून दरवर्षी होणार उलाढाल : 6 हजार कोटी रुपये
- कारखान्यावर उदरनिर्वाह असलेले कुटुंब : 3 लाख कुटुंब
- यंदाच्या हंगामात घटणारी उलाढाल : 3 ते 4 हजार कोटी रुपये

आता झालेल्या हंगामात जिल्ह्यात 169 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यंदाच्या हंगामात पन्नास लाख टनाच्या आसपास उत्पादन होण्याचा अंदाज आहे. छावणीसाठी मोठ्या प्रमाणात ऊस गेल्याने साखर उत्पादनात मोठी घट होणार आहे. पावसाअभावी नवीन लागण नसल्याने पुढील हंगामात या पेक्षाही विदारक स्थिती राहण्याची शक्‍यता आहे.
- सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया शुगर

पाण्याअभावी ऊस जळाल्याने आणि यंदा पावसा अभावी उसाची लागण न झाल्याने दोन वर्षे शेतकऱ्यांना उसाचे पीक घेता येणार नाही. उसाच्या माध्यमातून शाश्‍वत आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक गणिते आखता येतात. यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडणार आहे. सध्या बेण्यासाठी देखील ऊस उपलब्ध नाही.
- विकास झिंजाडे, शेतकरी

जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नसल्याने टॅंकरद्वारे पाणी प्यावे लागत आहे. पाण्याअभावी उसाच्या नवीन लागणी खोळंबल्या आहेत. ऊस नसल्याने साखर कारखाने तरी कसे सुरू होतील? सलग दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी.
- सिकंदर इस्माईल कोतवाल, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar business faced problems