आगीत झोपडी जळालेल्या ऊसतोडणी कामगारास मदतीचा आधार!

हरिभाऊ दिघे
रविवार, 25 मार्च 2018

ऊसतोडणी कामगार वसंत राठोड यांच्या झोपडीला आग लागल्याने झोपडी जळून खाक झाली.

तळेगाव दिघे (जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात आगीत झोपडी जळालेल्या ऊसतोडणी कामगाराच्या कुटुंबास आधार फाउंडेशनतर्फे धान्य, कपडे, किराणा व संसारोपयोगी साहित्य भेट देत मदतीचा हात देण्यात आला. 

समनापूर शिवारात शेरमाळे वस्तीवर अनेक ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्या आहेत. ऊसतोडणी कामगार वसंत मकराम राठोड यांच्या झोपडीला ता. 22 मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास चुलीतील विस्तवामुळे आग लागली. यावेळी घरातील सदस्य ऊसतोडणी कामासाठी गेलेले होते. हळूहळू पाचट जळत गेले व आगीत झोपडी जळून खाक झाली. ही बाब शेजारच्या कुटुंबप्रमुखांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच आसपासच्या लोकांना बोलावून आग विझवली. त्यामुळे पुढील झोपड्या जळण्याचा अनर्थ टळला. या घटनेत वसंत राठोड यांचा संसार जळून राख झाला. होते नव्हते तेवढे संपून गेले.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाबा जाधव यांनी आधार फाउंडेशनला माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आधार आधार फाउंडेशनतर्फे सदर गरीब कुटुंबाला धान्य, कपडे, किराणा व इतर संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. प्रसंगी समनापूरचे पोलिस पाटील गणेश शेरमाळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सोमनाथ शेरमाळे, साहेबराव शेरमाळे, हौशीराम शेरमाळे, आधारचे सदस्य डॉ. बाळासाहेब मुरादे, सखाराम माळी, अमित कदम, पी. डी. सोनवणे, अनिल कडलग, रामदास बालोडे, निवृत्ती शिर्के, लक्ष्मण कोते, बाबा जाधव, बाळासाहेब पिंगळे उपस्थित होते. सखाराम माळी यांनी या कामी सहकार्य केले. आधारच्या माध्यमातून मदत मिळाल्याबद्दल ऊसतोडणी कामगार वसंत राठोड यांनी आभार मानले.

Web Title: sugar cane worker hut fire foundation help