थकीत एफआरपीप्रश्नी एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा टक्के व्याजाच्या रकमेचे घोंगडे अडकून आहे. अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा संघटनेच्यावतीने एफआरपी व त्यावरील व्याजाच्या मागणीसाठी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले. 

थकीत एफआरपी व त्यावरील पंधरा टक्के व्याजाच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशने आंदोलने केली आहेत. तर जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा संघटनेच्यावतीनेही या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, याआधीही पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन केले होते. 1 मे रोजी पुन्हा आंदोलन करण्यात आले.

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेऊन 30 मे पर्यंत एफआरपीची रक्कम देण्याचे आदेश देऊ. मुदतीत एफआरपी न मिळाल्यास आरआरसी कारवाईतून हि रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल यासाठी प्रयत्न करण्याची लेखी ग्वाही दिली. 

30 जानेवारीला ऊस बिले थकविणाऱ्या 39 कारखान्यांवर व यानंतर टप्प्याटप्प्याने इतर कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याने कारखान्यांनी बिले देण्यास सुरुवात केली. काही कारखान्यांचा अपवाद वगळता 31 जानेवारी अखेर थकीत रकमा शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आरआरसी कारवाईत नमूद पंधरा टक्के व्याजाला मात्र फाटा देण्यात आला.

कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्जाची वसूली केली आहे. मात्र हक्काच्या व्याजाला शेतकरी मुकला आहे. हा हक्क शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही कारखान्यांनी एक जानेवारीपासून तुटलेल्या उसाची बिलेही अद्याप दिली नाहीत. याच मागणीसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

साखर आयुक्त श्री गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. पाच जून अखेर एफआरपी थकविलेल्या कारखान्यावर आरआरसी कारवाई व पंधरा टक्के व्याज वसूल करुन आरआरसी कारवाई पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन त्यांनी दिल्याचे श्री चुडमुंगे व श्री माने यांनी सांगितले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील उपस्थित होते.  

Web Title: Sugar Commissioner Shekhar Gaikwad warning on pending FRP