कारखान्यांकडून एकरकमी ‘एफआरपी’बाबत मौन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

काशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम देत शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. साखेरच्या किमान विक्री मूल्यात वाढ करून एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

काशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम देत शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. साखेरच्या किमान विक्री मूल्यात वाढ करून एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

ऊस गाळप हंगाम सुरू होताना शेतकरी संघटना प्रतिनिधी व साखर कारखाने प्रतिनिधी यांच्यामध्ये प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत एकरकमी एफआरपीचा निर्णय मान्य करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्‍य नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के म्हणजेच प्रतिटन २२०० ते २६०० रुपयांपर्यंत पहिली उचल दिली आहे.

यानंतर  केंद्र सरकारकडून साखरेचे किमान विक्री मूल्य प्रति क्विंटल २९०० रुपयांवरून ३१०० रुपये करण्यात आले. या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन केल्यावर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामुळे उर्वरित एफआरपी मिळण्याची शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती. सांगलीतील दोन व कोल्हापूर जिल्ह्यातील एक अशा तीन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली असतानाही इतर साखर कारखान्यांनी याबाबत मौन पाळले आहे.

यामुळे एकरकमी एफआरपीबाबत शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. साखरेची किमान विक्री मूल्यात वाढ होऊनही उर्वरित एफआरपीबाबत कारखान्यांकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मार्चअखरे सुरू असल्याने पीक कर्ज जुने-नवे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे.

एफआरपीमधील २० ते २५ टक्के रक्कम कारखान्यांकडे अडकून पडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सर्व कारखान्यांनी मौन धारण केल्यामुळे उर्वरित एफआरपीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात ७८ लाख टन गाळप
जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांद्वारे ७८ लाख ८० हजार ८१३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून ९३ लाख ३४ हजार ३२५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. गाळपाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून, सध्या सरासरी ११.८४ टक्के उतारा मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Factory FRP Farmer