दुधापाठोपाठ ऊस बिलेही थकणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

कोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात पहिल्या पंधरवड्यात तुटलेल्या उसाची बिले सोमवारपासून कारखान्यांमार्फत बॅंकेत जमा केली जाण्याची शक्‍यता आहे. रक्कम जमा होईल; पण चलन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मात्र ही रक्कम लगेच मिळण्याची शक्‍यता नाही. दरम्यान, विभागातील कारखान्यांनी लवकरात लवकर एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आवाहन प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी साखर कारखाना प्रतिनिधींच्या गुरुवारच्या (ता. १) बैठकीत केले.

यंदाचा हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. शेतकरी संघटना, शासन व कारखाना प्रतिनिधींच्या बैठकीत यावर्षी एफआरपी व प्रतिटन १७५ रुपये जादा देण्यावर तोडगा निघाला होता. हंगाम सुरू होऊन सोमवारी महिना होईल; पण अजूनही पहिल्या पंधरवाड्यातील पैसे कारखान्यांनी जमा केलेले नाहीत. ऊस नियंत्रण कायद्यानुसार तुटलेल्या उसाला पंधरा दिवसांत पैसे देण्याची तरतूद आहे.

हंगाम सुरू झाला आणि लगेच जुन्या ५०० व १००० च्या नोटांवर केंद्राने बंदी घातली. नोटाबंदीचा फटकाही ऊस बिले देण्यात अडसर ठरत आहेत. गेले महिनाभर जिल्ह्यात या नोटाबंदीवरच चर्चा सुरू आहे. या धामधुमीतच बहुतांशी कारखान्यांनी आपली पहिली उचल जाहीर करून ती बॅंकेत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल असे जाहीर केले आहे. त्यात दत्त-शिरोळ, शाहू-कागल, राजाराम-बावडा, जवाहर-हुपरी, हमीदवाडा-कागल आदी कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी काही कारखान्यांनी रक्कम वर्ग केली तर उर्वरित कारखाने सोमवारी ही रक्कम वर्ग करतील असे काल झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. सोमवारपर्यंत सर्वच कारखान्यांकडून पहिल्या पंधरा दिवसांत तुटलेल्या उसाची बिले जमा केली जातील. 
उसाचे बिल जमा होईल; पण ते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हातात कधी पडणार हाच गंभीर प्रश्‍न आहे. कारण नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका जिल्हा बॅंकेला बसला आहे. सर्वच कारखान्यांची बिले जिल्हा बॅंकेमार्फत विकास सोसायटीकडे व तेथून शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग होतात. जिल्हा बॅंकेला पुरेसा चलन पुरवठा होत असल्याने फक्त कागदोपत्री ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल, प्रत्यक्ष त्यांच्या हातात ही रक्कम पडायला महिनाभर लागेल.

Web Title: sugarcane bills will be pending