ऊसतोड मजुरांचा पोलिस पथकावर हल्ला

ऊसतोड मजुरांचा पोलिस पथकावर हल्ला

कडेगाव - चिंचणी (ता. कडेगाव) येथे जिंतूर (जि. परभणी) येथील पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षकांसह दोन पोलिस शिपायांना ऊसतोड  मजुरांच्या जमावाने मारहाण करून जखमी केले. त्यापैकी एका पोलिस शिपायाला दोरीने गळफास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आठ ऊसतोडणी मजुरांविरुद्ध चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार काल रात्री साडेबाराच्या सुमारास घडला.

अपहृत व्यक्तीची सुटका
दोघा संशयितांनी अपहरण करून आणलेल्या नारायण पाडुरंग ठोके (रा. लिलज, ता. चिंतूर, जि. परभणी) यांची जिंतूर आणि चिंचणी-वांगी पोलिसांच्या पथकाने आज सुटका केली. त्याला घेऊन जिंतूरचे पोलिस पथक पुन्हा तिकडे रवाना झाले आहे.

या बाबत चिंचणी-वांगी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः भास्कर मोहन राठोड व राजू सवईराम राठोड (दोघे रा. जामदांडा बुद्रुक, जि. परभणी) यांच्याविरुद्ध जिंतूर  पोलिस ठाण्यात एका ऊसतोड मजुराच्या अपहरण  प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी जिंतूरचे पोलिस उपनिरीक्षक सुनील  भास्करराव अवसरमोल यांच्यासह पोलिस शिपाई पांडुरंग साहेबराव तुपसुंदर व व्यंकट रामराव नरवाडे काल रात्री साडेबाराच्या सुमारास चिंचणी येथे आले होते. 

यावेळी जिंतूर पोलिस चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यातील एका पोलिसाबरोबर चिंचणी येथील गंधर्व हॉटेलच्या बाजूला रहात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या झोपडीकडे गेले. यावेळी जिंतूर पोलिसांनी संशयित भास्कर राठोड व राजू राठोड यांना बोलवून जिंतूर पोलिसात तुमच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगितले. त्यावर भास्कर व राजू राठोड यांनी ऊसतोड कामगारांचा जमाव जमवून जिंतूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील भास्करराव अवसारमोल व पोलिस पांडुरंग साहेबराव तुपसुंदर तसेच व्यंकट रामराव नरवाडे यांना शिवीगाळ केली.

काठीसह अन्य लाकडी हत्याराने मारहाण केली. यावेळी तुपसुंदर यांच्या गळ्याभोवती दोरी लावून त्यांना गळफास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी बरोबर गेलेल्या चिंचणी वांगी पोलिस कर्मचाऱ्याने चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली. यावर सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्यासह पोलिस कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी  धाव घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.

पोलिसांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भास्कर मोहन राठोड (वय ३७), राजू सवईराम राठोड (वय ४०), सुदाम सवईराम राठोड (वय ५०), विजेश ऊर्फ विजय राजू राठोड (वय २२), विकास राजू राठोड (वय ५०), दशरथ शंकर जाधव (वय २९, सर्व रा. जामतांडा बुद्रुक ता. जिंतूर, जि. परभणी), विजेश ऊर्फ विजय नामदेव आडे (वय २६, रा. ऐनोली तांडा), विलास पंडित गडदे (वय २४, रा. नेऊरवाडी, पोस्ट तालंग, ता. हदगाव, जि. परभणी) या आठ संशयितांविरोधात चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई पांडुरंग रावसाहेब तुपसुंदर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com