ऊस उत्पादकांना दुसऱ्या बिलाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

प्रचाराच्या धामधुमीत ऊस बिल दुर्लक्षित
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून, आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक असलेल्या उसाच्या पिकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. या मुद्याला प्रचारात स्थान दिलेले दिसत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

काशीळ - जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम अदा केली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. शिल्लक ‘एफआरपी’ कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सह्याद्री कारखान्याचा गाळप हंगाम अजूनही सुरू आहे. एप्रिलअखेर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी ८४ लाख ७९ हजार ७३९ मेट्रिक टन ऊस गाळपाव्दारे एक कोटी एक लाख २७ हजार ८८० क्विंटल साखरेची निर्मिती केली. जिल्ह्यात ११.९४ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. या गाळप हंगामात गतवर्षीप्रमाणेच साखर निर्मितीची कोटीची उड्डाणे मारलेली आहेत. त्यामुळे सर्वच कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध आहे.

ही साखर बहुतांशी कारखान्यांनी कारखाना परिसरातील मोकळ्या जागेत ताडपत्रीने झाकून ठेवली आहे. ऐन गाळप हंगामात साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जाहीर केलेली एकरकमी एफआरपी कारखान्यांना देता आली नाही. यावेळी साखर कारखान्यांनी दराचे ८०-२० हे सूत्र स्वीकारत पहिली उचल म्हणून एफआरपीच्या ८० टक्के रक्कम दिली होती. 

दरम्यान, शेतकऱ्यांना दर देता यावा यासाठी शासनाने साखरेची किमान विक्रीमूल्य ३१०० रुपये क्विंटल निश्‍चित केल्याने उर्वरित ‘एफआरपी’बाबत शेतकऱ्यांच्या आशा निर्माण झाल्या होत्या. हंगाम संपण्याअगोदर शिल्लक ‘एफआरपी’चा दुसरा हप्ता मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, हंगाम संपला तरी साखर कारखान्यांनी शिल्लक ‘एफआरपी’ बाबत मौन बाळगले असल्याने शेतकऱ्यांच्यात चिंता निर्माण झाली. ८०-२० च्या सूत्रामुळे प्रत्येक कारखान्याकडे प्रतिटन ५०० ते ६०० रुपये शिल्लक आहेत. ‘एफआरपी’चे तुकडे झाल्याने शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. पीक कर्ज नवे जुने करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने हातउसने घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

Web Title: Sugarcane Production Second Bill FRP