जिल्ह्यात ऊसदराचा 80-20 फॉर्म्युला? 

विकास जाधव
सोमवार, 7 जानेवारी 2019

काशीळ -गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असताना केवळ अजिंक्‍यतारा व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल दिली आहे. या कारखान्यांनी दिलेल्या दरावरून एकरकमी "एफआरपी'ऐवजी "80-20' या फॉर्म्युल्यानुसार दर दिल्याचे दिसत असल्याने इतरही साखर कारखाने हाच "फॉर्म्युला' स्वीकारतील, अशी चिन्हे दिसत आहेत. 

काशीळ -गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असताना केवळ अजिंक्‍यतारा व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल दिली आहे. या कारखान्यांनी दिलेल्या दरावरून एकरकमी "एफआरपी'ऐवजी "80-20' या फॉर्म्युल्यानुसार दर दिल्याचे दिसत असल्याने इतरही साखर कारखाने हाच "फॉर्म्युला' स्वीकारतील, अशी चिन्हे दिसत आहेत. 

जिल्ह्यातील 14 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाच्या झळा तीव्र असल्याने बहुतांशी कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर उपलब्ध झाले असल्याने विनाखंडित गाळप हंगाम सुरू आहे. हा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अजिंक्‍यतारा कारखान्याने या हंगामात ऊसदराची कोंडी फोडत पहिली उचल म्हणून प्रतिटन 2300 रुपये दर दिला आहे. त्यानंतर जयवंत शुगरने प्रतिटन 2400 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले आहेत. या दोन्ही कारखान्यांची एफआरपी पाहता "80- 20' या फॉर्म्युल्यानुसार एफआरपी दिली असल्याचे दिसून येत आहे. साखरेचे दर 2900 ते 2950 रुपये क्विंटल आहेत. साखरेच्या बाजारभावाच्या 85 टक्के कर्ज पुरवठा बॅंकांकडून दिला जातो. यातून तोडणी, वाहतूक व प्रक्रिया जाता पहिल्या उचलीसाठी "80-20' प्रमाण स्वीकारण्याशिवाय पर्याय नसल्याचे कारखान्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे उर्वरित कारखाने हाच "फॉर्म्युला' कायम ठेवतील, असे सध्यातरी दिसत आहे. 

साखरेच्या दरात सुधारणा होत नसल्यामुळे साखर कारखान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. मात्र, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. एफआरपीचे तुकडे झाल्याने घेतलेले पीककर्ज फिटणार नाही. पहिली उचल उशिरा आल्याने किमान दीड महिन्याचे अधिक व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. तसेच उसाच्या बिलातून देण्यात येणारी वार्षिक देणी लांबणीवर जाणार आहेत. कमी पर्जन्यमानामुळे उसाचे अपेक्षित वजन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानाच बिलाचे तुकडे झाल्याने या नाराजीत भर पडली आहे. 

शेतकरी संघटना काय भूमिका घेणार?  
जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांकडून एकरकमी एफआरपीची मागणी कायम आहे. मात्र, सध्याचे साखरेचे दर व बॅंकांकडून मिळणारे कर्ज पाहता कारखानदारांकडून उसाला "80-20' या फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिला जाईल, असे दिसत आहे. आता शेतकरी संघटना ऊसदराबाबत काय भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे. 

Web Title: Sugarcane rate 80-20 formula in the district