जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

काशीळ - गेले काही दिवस ऊस दराबाबत झालेली कोंडी अखेर अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल म्हणून प्रति टनास २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून फोडली आहे. त्यामुळे आता इतर कारखाने किती दर काढणार तसेच पहिल्या उचलीबाबत शेतकरी संघटना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागणार आहे. 

काशीळ - गेले काही दिवस ऊस दराबाबत झालेली कोंडी अखेर अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल म्हणून प्रति टनास २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून फोडली आहे. त्यामुळे आता इतर कारखाने किती दर काढणार तसेच पहिल्या उचलीबाबत शेतकरी संघटना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागणार आहे. 

ऊस गाळप हंगाम सुरू होताना शेतकरी संघटना व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत पहिल्या उचलीपोटी एकरकमी एफआरपी व साखरेचे दर वाढल्यास २०० रुपये असा पॅटर्न स्वीकारण्यात आला होता. पण, त्यानंतर साखरेच्या दरात मोठी घसरण होऊन ते प्रति क्विंटल २९०० ते २९५० दरम्यान आल्याने राज्यातील सर्वच कारखान्यांनी पहिल्या उचलीबाबत मौन पाळले. परिणामी हंगाम सुरू होऊनही दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला तरी पहिली उचल दिली गेली नव्हती. साखरेच्या दरात घसरण झाल्याने बॅंकांकडूनही कारखान्यांना त्या तुलनेत कमी कर्ज पुरवठा झाला. बॅंकांकडून मिळणाऱ्या कर्जातून वाहतूक, तोडणी व प्रक्रिया खर्च वजाकरता एकरकमी एफआरपी देणे शक्‍य होणार नसल्याचे कारखान्यांकडून अगोदरपासून सांगितले जात होते. मात्र, शेतकरी संघटनांकडून ठरल्याप्रमाणे एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे, अशी मागणी कायम होती. तसे न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. या कारणामुळे साखर कारखान्यांनी पहिल्या उचलीस विलंब लावला होता. तर ऊस जावूनही पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. 

साखरेचे घसरणारे दर पाहता कारखाने किती उचल देणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतानाच, शेंद्रे येथील अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याने त्याबाबत धाडसी पाऊल उचलत प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. अजिंक्‍यतारा कारखान्याचा दर आणि एफआरपीचा विचार करता ८०-२० चा फार्म्युला स्वीकारला गेल्याचे दिसत आहे. त्यावर आता जिल्ह्यातील अन्य कारखाने कधी व किती उचल देणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष
साखरेच्या दरातील घसरणीमुळे गत हंगामाच्या अंतिम टप्प्यात कारखान्यांकडून वेगवेगळे दर देण्यात आले. तर या हंगामाच्या सुरवातीस गत हंगामाप्रमाणेच स्थिती झाल्याने शेतकरी संघटना ऊस दराबाबत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेमकी काय भूमिका घेणार आणि उसाची विपुल उपलब्धता पाहता शेतकरी काय निर्णय घेणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title: Sugarcane Rate Issue Solve