मसूर भागात उसाच्या वजनात घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

प्रयत्न पडले अपुरे
हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी थायमेट, बीएससी पावडर, वेगवेगळ्या कीटकनाशकाच्या रासायनिक फवारण्या, तसेच कृषी अधिकारी, सह्याद्री कारखान्याचे मार्गदर्शन आदींसह इतर गोष्टी करण्यात आल्या होत्या, तर उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी उंदीर मारी वनस्पतीचा वापर करण्यात आला होता. या सर्व गोष्टींचा मर्यादित उपयोग झाल्याचे दिसून येत आहे.

हुमणी कीड, उंदराचे वाढलेले प्रमाण, लोकरी माव्यासह अन्य बाबी कारणीभूत
मसूर - विभाग उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. शेतकरी आधुनिक पद्धतीने उसाची शेती करून जादा उत्पादन घेत असतात. मात्र, सात आठ महिन्यांपूर्वी झालेला हुमणी किडीचा प्रादुर्भाव आणि उसात वाढलेली उंदराचे प्रमाण, लोकरी माव्यासह अन्य कारणाने उसाचे वजन घटल्याची स्थिती आहे. 

विभागात मसूरसह हेळगाव, पाडळी, किवळ, निगडी, कोणेगाव, शिरवडे, रिसवड, अंतवडी, चिखली, खराडे, कालगाव अन्य गावांत मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. आडसाली हंगामासह सुरूची उसाची लागण करून उत्पादन घेतले जाते. त्यासाठी चांगल्या जातीच्या ऊस बियाणांची निवड करून शेतकरी जादा उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न असतो. त्यातून एकरी ८० ते १०० टन उसाचे उत्पादन घेणारे काही शेतकरी आहेत. 

आठ ते दहा महिन्यांपूर्वी ऊस पिकाला हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला होता. ही कीड आटोक्‍यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले होते; पण उसाचे वजन घटत असल्याने ते प्रयत्न अपुरे ठरले. आडसाली उसापेक्षा खोडवा पिकाचे वजन घटण्याचे प्रमाण जादा आहे. हुमणीचे संकट असतानाच गेल्या चार महिन्यांपासून उंदराच्या संख्येत वाढ झालेली आहे. उसाच्या मुळ्या कुरडल्याने उसाच्या वजनात घट झालेली आहे. बहुतांश ठिकाणी उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. सध्या उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात सुरू आहे. अनेक शेतकरी उसाचे टनेज कमी होत असल्याचे सांगत आहेत.

गत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत कोपर्डे हवेली परिसरात कमी होते. त्याचा परिणाम म्हणून हुमणी किडीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर झाला, तसेच जादा पाऊस असेल तर उंदरे उसात थांबत नाहीत. त्यांची उत्पती कमी राहते. हुमणी, उंदीर दोन्ही गोष्टींचा ऊस  पिकावर परिणाम होउन उसाचे वजन घटत आहे.

गेल्या वर्षी सरासरी उसाचे एकरी साठ ते सत्तर टनेज निघाले होते. तेच या वर्षी खोडव्याचे टणेज तीस ते पस्तीस टन निघाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्याहून टणजे कमी झाले आहे.
- जयवंत देसाई, ऊस उत्पादक, शेतकरी

Web Title: Sugarcane Weight Decrease