उसाला देणार "ते' अडीच हजाराचा भाव 

sugarcane will be Rs 2500
sugarcane will be Rs 2500

कोपरगाव : ""यंदा गळितास येणाऱ्या उसाला टनाला 2500 रुपयांप्रमाणे पहिला हप्ता देऊ. पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करावी,'' असे आवाहन माजी आमदार अशोक काळे यांनी केले. 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (ता. 28) रोजी झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे होते. माजी आमदार काळे व त्यांच्या पत्नी पुष्पा काळे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामास प्रारंभ झाला. 

काळे म्हणाले, ""ऊसउत्पादन घटल्यामुळे त्याचा परिणाम कारखान्यांवर होणार आहे. ऊसउत्पादकांसह ऊसपुरवठादार, वाहतूकदार, साखर कामगार, ऊसतोडणी कामगार या सर्व घटकांना त्याची झळ बसणार आहे.

ऊसउत्पादनासह साखरेचा उताराही या वर्षी घटेल. हा हंगाम अडचणीचा ठरेल. कारखानानिहाय मागील तीन वर्षांचा सरासरी साखरउतारा विचारात घेऊन व चालू हंगामात येणारा साखरउतारा घट वजा करून जी काही साखरउताऱ्यात घट येईल, त्यास राज्य सरकारने अनुदान स्वरूपात कारखान्यांना मदत करावी. उसाला यंदा प्रतिटन 2500 रुपये पहिला हप्ता देऊ. जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देऊ.'' 

या वेळी छबूराव आव्हाड, सुधाकर आवारे, सभापती अनसूया होन, कारभारी आगवण, नारायण मांजरे, डॉ. अजय गर्जे, संभाजीराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, माधव खिलारी, कार्यकारी संचालक गिरीश जगताप आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे व सचिव सुनील कोल्हे यांनी केले. संचालक सूर्यभान कोळपे यांनी आभार मानले.  

प्रलंबित प्रश्न साेडविणार

""विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमदार आशुतोष काळे यांना विजयी केले. कोपरगाव मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याबाबत आमदार आशुतोष काळे यांना सांगितले आहे.'' 

वैभवात भर घातली ः कुदळे

माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी कारखान्याची जबाबदारी सांभाळली तिच परंपरा आमदार आशुतोष काळे यांनी पुढे चालवत कारखान्याच्या वैभवात भर घातली आहे, असे पद्माकांत कुदळे म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com