प्राध्यापिकेने 'यामुळे' केला आत्महत्येचा प्रयत्न!

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पोलिस निरीक्षकांनी दमदाटी केल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख; खासगी रुग्णालयात उपचार सुरु

सोलापूर, ता. 12 : पती आणि त्याच्या प्रियसीच्या त्रासाला कंटाळून जुळे सोलापुरातील प्राध्यापिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्रिवेणी सचिन चाबुकस्वार (वय 32, रा. जानकीनगर, जुळे सोलापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. याप्रकरणात पतीवर कारवाईची मागणी केल्यानंतर विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास काळे यांच्याकडून दमदाटी झाल्याचा उल्लेख चाबुकस्वार यांनी चिठ्ठीमध्ये केला आहे. 

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्रिवेणी चाबुकस्वार यांनी राहत्या घरी पतीच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्रिवेणी चाबुकस्वार यांनी चिठ्ठी लिहिली आहेत. या चिठ्ठीमध्ये पोलिस निरीक्षक काळे यांनी दमदाटी केल्याचा उल्लेख केला आहे.

 

"पतीचे बाहेर दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक कैलास काळे यांनी फोन करून मला चौकशीसाठी बोलावले. मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळे मी चौकीला गेले नाही. आई-वडिलांना पाठविले. काळे यांनी आई-वडीलांना अपशब्द वापरले. काळे यांनी माझे कधीच ऐकून घेतले नाही. माझ्या आई-वडिलांना आत घालण्याची धमकी दिली. रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी माझे जिवन संपवू इच्छिते.' दरम्यान, चाबुकस्वार यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांचे वडील माजी सैनिक बाबासाहेब कांबळे सांगितले. 

--
त्रिवेणी चाबुकस्वार आणि त्यांच्या पतीचे पटत नाही. पतीचे बाहेर महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या तक्रारीवरून पतीवर आधीच गुन्हा दाखल केला आहे. 
- कैलास काळे, 
पोलिस निरीक्षक 

माझी मुलगी त्रिवेणी चाबुकस्वार हिचा पतीकडून आणि त्याच्या प्रेयसीकडून छळ होत आहे. याबाबत पोलिसात तक्रार करूनही अपेक्षीत दखल घेतली जात नाही. उलट आम्हालाच दमदाटी केली जाते. याबाबत आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत. एका माजी सैनिकाची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना किती अडचणी येतील असतील. 
- बाबासाहेब कांबळे, 
माजी सैनिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suicide attempt by a lady professor