कोल्हापूरः एकतर्फी प्रेमातून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

"मला तुमच्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी द्या, नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन' अशी एकतर्फी प्रेमातून धमकी देत तरूणाने थेट विषाची बाटली तोंडाला लावली. त्याला तातडीने नागरिकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उमेश सुभाष बेनके (वय 25, रा. दऱ्याचे वडगाव, करवीर) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार काल सायंकाळी मिरजकर तिकटी परिसरात घडला.

कोल्हापूर - "मला तुमच्या मुलीशी लग्न करण्याची परवानगी द्या, नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन' अशी एकतर्फी प्रेमातून धमकी देत तरूणाने थेट विषाची बाटली तोंडाला लावली. त्याला तातडीने नागरिकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उमेश सुभाष बेनके (वय 25, रा. दऱ्याचे वडगाव, करवीर) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार काल सायंकाळी मिरजकर तिकटी परिसरात घडला. याबाबत संशयित उमेश बेनकेवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, उमेश बेनके हा दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे राहतो. तो उच्च शिक्षीत असून तो शहरातील काही खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करतो. कामाच्या ठिकाणी काही दिवसापूर्वी त्याची शहरातील एका तरुणीशी ओळख झाली. त्यातून त्यांच्यात मैत्री झाली. मात्र तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. त्याने तिच्याकडे प्रेम व्यक्त करून लग्नाचाही प्रस्ताव ठेवला होता. मात्र तिने तो धुडकावून लावला. यातूनच तो काल सायंकाळी सहाच्या सुमारास मिरजकर तिकटी परिसरातील तिच्या घराजवळ गेला.

त्याने संबधित तरुणीच्या वडीलांना दारात बोलवून घेतले. त्यांनी त्याच्याकडे तू कोण अशी विचारणा केली. तेव्हा त्याने "मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे, मला परवानगी द्या. अन्यथा मी विष पिऊन आत्महत्या करेन' अशी धमकी दिली. तसे मुलीच्या घरातील नातेवाईक तेथे जमा झाले. त्यांच्याशी वाद घातल उमेशने खिशातील विषाची बाटली काढली आणि त्याने ती बाटली थेट तोंडाला लावली.

हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी त्याला रोखण्याही प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. नागरिकांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

दरम्यान याबाबत संबधित तरूणींच्या घरच्यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिसात दिली. त्यानुसार आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी उमेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

घरच्यांना धमकावण्याचा प्रयत्न... 
मुलींची छेड काढणे, त्यांना धमकावून प्रपोज करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. मात्र एकतर्फी प्रेमातून आत्महत्येचा प्रयत्न करून थेट मुलीच्या घरच्यांना धमकावण्याचा या प्रकाराचीही पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide attempt of Youth in One-sided love case