परप्रांतीय कारागिराच्या पत्नीची आत्महत्या

परप्रांतीय कारागिराच्या पत्नीची आत्महत्या

कोल्हापूर - चारित्र्य बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे व सोन्याच्या वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून परप्रांतीय कारागिराच्या पत्नीने काल रात्री टेरेसवर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रियांका विश्‍वजित घोडाई (वय २५, सध्या रा. विठोबा तालीम मागे, दुधाळी) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. याप्रकरणी संशयित बंगाली कामगाराला लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. कार्तिक दुलाल देऊती (२४, सध्या रा. गुजरी, मूळ रा. मोतीमाला, हावडा, पश्‍चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, विश्‍वजित घोडाई  (३८) हे दागिन्यांचे कारागीर आहेत. ते मूळचे गंगाप्रसाद, दासपूर, पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी दुधाळी जवळील विठोबा तालमीच्या पिछाडीस दुमजली घर घेतले आहे. तेथे ते पत्नी रियांका व आठ वर्षाचा मुलगा सुबोजित यांच्यासोबत राहतात. त्यांच्याकडे कार्तिक देऊती हा कामगार दोन वर्षे कामास होता.

सहा महिन्यांपूर्वी त्याने काम सोडले. सध्या तो गुजरीत काम करतो. नोकरीस असताना त्याचे घोडाई यांच्या घरी येणे जाणे होते. त्यातून त्यांच्या पत्नी रियांका यांच्याशी ओळख झाली. काल रात्री अकराच्या सुमारास संशयित कार्तिक हा घोडाई यांच्या घरी गेला होता. काही वेळ थांबून तो तेथून निघून गेला. रात्री बाराच्या सुमारास घोडाई हे कामावरून घरी आले. त्यांना पत्नी दिसली नाही. त्यांनी मुलाला आई कोठे गेली आहे? असे विचारले.

त्यावेळी त्याने आई टेरेसवर गेली असल्याचे त्यांना सांगितले. तसे ते टेरेसवर गेले. त्यावेळी त्यांना पत्नी रियांका यांनी टेरेसवरील रूमच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ओरडा करत त्यांना खाली उतरवले. याची माहिती त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रियांका यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

दरम्यान, आज सकाळी पती विश्‍वजित घोडाई यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित कार्तिक देऊती याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला अटक केली. सीपीआरमध्ये शवविच्छेदनानंतर रियांका घोडाई यांचा मृतदेह पोलिसांनी नातेवाइकांच्या ताब्यात दिला. अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांनी मृतदेह पश्‍चिम बंगालला हलविला. याबाबत तपास सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील करीत आहेत. 

धमकी... 
पोलिसांना घटनास्थळी रियांका घोडाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली बंगाली भाषेतील चिठ्ठी सापडली. दुभाषिकाला पोलिसांनी आणून बंगाली भाषेतील चिठ्ठीत काय लिहिले हे जाणून घेतले. ‘तुझे चारित्र्य चांगले नाही. याची समाजात बदनामी करू,’ अशी धमकी देत, वारंवार पैसे व सोन्याची मागणी संशयित कार्तिक त्यांच्याकडे करत त्यांना ब्लॅकमेल करत होता. त्यालाच कंटाळून त्यांनी आत्महत्येचा हा मार्ग निवडला, असा मजकूर असल्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले. 

घातपाताची चर्चा... 
रियांका यांचा घातपात झाल्याची चर्चा काल रात्रीपासून दुधाळी परिसरात सुरू आहे. मात्र, ही आत्महत्याच आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, संशयित कार्तिकच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालातून त्यांनी आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले. 

उपचारास उशीर झाल्याची चर्चा 
टेरेसवर रियांका यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना खाली उतरवले. त्यानंतर पोलिसांना बोलविले. यात बराच वेळ गेला. त्यांचा मृत्यू झाला असावा, असा समज करून शवविच्छेदनाची गाडी बोलविली. त्यात त्यांना ठेवताना त्यांची हालचाल जाणवली. तसे त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वेळेत उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या, अशी चर्चा परिसरात सुरू होती. 

आत्महत्या करणार असल्याचा फोन... 
रात्री अकराच्या सुमारास संशयित कार्तिक हा घोडाई यांच्या घरात गेला. काही वेळाने तेथून तो बाहेर पडला. त्यानंतर त्याला रियांका घोडाई यांनी फोन केला होता. त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे त्याला सांगितले. मात्र, त्याने काय करायचे ते कर, असे त्यांना उत्तर दिले, असे मोबाईलवरील संभाषण पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याआधारे पुढील तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com