शाहूवाडी तालुक्यात दोन चिमुकल्यांसह मातेची पेटवून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

एक नजर

  • नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेची दोन चिमुकल्यांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या
  • स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी मृतांची नावे.
  • आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र अस्पष्ट. 

भेडसगाव - नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील विवाहितेने दोन चिमुकल्यांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. स्वाती महेश पाटील (वय २८), विभावरी महेश पाटील (४), देवांश महेश पाटील (१) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. 

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार नेर्ले येथील शिवाजी बापू पाटील हे पत्नी नंदा, सून स्वाती, नात विभावरी, नातू देवांश यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयामागील बंगल्यात राहतात. मृत स्वाती यांचे पती महेश २००८ मध्ये सैन्यात भरती झाले असून, सध्या ते जैसलमेर (राजस्थान) येथे सेवेत आहेत. भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे स्वाती यांचे माहेर असून, त्यांचे वडील कृष्णा धुमाळ हे प्रिंटिंग व्यवसायानिमित्त सध्या पत्नीसह मुंबईत वास्तव्यास आहेत. 

२०१३ मध्ये स्वाती यांचा महेश यांच्याशी विवाह झाला. स्वाती या उच्चशिक्षित होत्या. त्या घरीच साडी विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. सासरे शिवाजी पाटील हे माजी सैनिक आहेत. चार वर्षांची मुलगी विभावरी कोकरूड येथील नर्सरी स्कूलमध्ये शिकत होती. 

दरम्यान, शिवाजी पाटील यांच्या घरातील स्वयंपाकघराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. आज सकाळी सासू नंदा साफसफाई उरकून दोन्ही नातवंडांसह शेजारी नातलगांकडे गेल्या होत्या; तर सासरे शिवाजी हे गावातील एका साखरपुडा कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, सासू नंदा यांच्याकडून स्वाती यांनी जेवण भरविण्याचे निमित्त करून आपल्या दोन्ही मुलांना घरी आणले. 

काही वेळानंतर शेजारील महिला तेथून जात असताना घरातून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. त्यामुळे महिलेने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वाती यांनी खोलीच्या दोन्ही बाजूंना कडी लावल्याने दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सासू व सासरेही तेथे दाखल झाले; परंतु अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने गंभीर भाजल्याने स्वाती व विभावरी या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या. देवांशची किंचित हालचाल जाणवत असल्याने त्याला उपचारांसाठी कोल्हापूरला नेत असताना  वाटेत त्याचाही मृत्यू झाला.

पोलिसपाटील दीपाली गवळी यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यास घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विजय चव्हाण, प्रियांका सराटे, हवालदार बांबळे, पोलिस नाईक दाभोलकर आदींनी पंचनामा केला. 

गावावर शोककळा
येत्या २३ व २४ एप्रिलला ग्रामदैवत जोतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार होती. परंतु, तत्पूर्वीच हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

माहेरचे लोक आक्रमक
रात्री दहाला मृत स्वाती यांचे आई-वडील मुंबईहून आल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. माहेरचे लोक आक्रमक झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

Web Title: Suicide incidence in Nerle Shahuwadi Taluka