सासरच्या छळाला कंटाळून परितेत विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून परितेत विवाहितेची आत्महत्या

शाहूनगर - परिते (ता. करवीर) येथील अश्‍विनी दिग्विजय बामणे (वय ३१) यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मोटारीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करत पती, सासूसह सासऱ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिच्या माहेरच्या लोकांनी घेतला. अखेर पहाटे करवीर पोलिसांनी पती दिग्विजय आनंदा बामणे (वय ३२), सासू लीला आनंदा बामणे (५५) आणि सासरा आनंदा विष्णू बामणे (६२, सर्व रा. परिते) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - हसूर दुमाला (ता. करवीर) येथील अश्‍विनी यांचा आठ वर्षांपूर्वी दिग्विजय बामणेशी विवाह झाला होता. तो कागल एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामास आहे. या दाम्पत्याला मुलगा व मुलगी आहे. दिग्विजयला मोटार घ्यायची होती. त्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा वर्षभरापासून पत्नीकडे लावला होता; मात्र माहेरची आर्थिक कुवत नसल्याने अश्‍विनी या मागणीला नकार देत होत्या. यामुळे पतीसह सासू लीला व सासरा आनंदा त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करत होते. या छळाला कंटाळूनच अश्‍विनी यांनी मंगळवारी रात्री घरामागील खोलीत तुळईला गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार उघडकीस आला. बेशुद्धावस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

हा प्रकार माहेरच्या लोकांना कळताच त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. सासरच्या छळाला कंटाळून अश्‍विनीने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा माहेरकडील लोकांनी घेतल्याने वातावरण गंभीर बनले. अन्य नातेवाईक व पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ठाम राहिले. अखेर करवीर पोलिसांनी पहाटे अश्‍विनी बामणे यांचे वडील यशवंत बापू पोवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत पती दिग्विजय, सासू लीला व सासरे आनंदा यांना अटक केली.

दुर्लक्षाने केला घात 
मोटारीसाठी पैसे आणण्याचा तगादा वर्षभरापासून दिग्विजयने लावला होता. यामुळे अश्‍विनी यांचे माहेरीही जाणे-येणे बंद केले होते. मात्र, मोटारीचा विषय आज ना उद्या मागे पडेल, या आशेतून अश्विनी यांच्या वडिलांनी अन्य नातेवाईक किंवा पोलिसांकडे जाणे टाळले होते. या विषयाकडे केलेले दुर्लक्ष आमच्या मुलीचा घात करून गेले, अशी भावना अश्‍विनीच्या आई अनिता यांनी व्यक्त केली. दरम्यान, दोन वर्षांचा मुलगा आदर्श व मुलगी आराध्या यांचे आईचे छत्र हरपले. पोलिसांनी दिग्विजयसह त्याच्या आई-वडिलांना अटक केल्याने दोन्ही चिमुकली सध्या हसूर येथे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com