राधानगरी तालुक्यातील तरुणाची आर्थिक नैराश्‍याने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राशिवडे बुद्रुक - नोकरीचा अभाव आणि आर्थिक नैराश्‍यामुळे वाघवडे (ता. राधानगरी) येथील सुनील शिवाजी यादव (वय ३५) याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज पहाटे गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यामुळे ही घटना उघडकीस आली.

राशिवडे बुद्रुक - नोकरीचा अभाव आणि आर्थिक नैराश्‍यामुळे वाघवडे (ता. राधानगरी) येथील सुनील शिवाजी यादव (वय ३५) याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज पहाटे गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यामुळे ही घटना उघडकीस आली. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर घडलेल्या या घटनेने गावात व परिसरात तीव्र चर्चा होती. याची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - सुनीलने नोकरीसाठी एका ठिकाणी सहा वर्षापूर्वी पैसे भरले होते; पण नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे कुटुंब खर्चासाठी सध्या तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तोकडा पगार आणि धावपळीमुळे तो आर्थिक चिंताग्रस्त होता. रविवारी (ता. ५) रात्री तो सासरवाडी राशिवडे खुर्द (ता. राधानगरी) येथे पत्नीसह गेला होता. परत एकटाच आला. रात्री येऊन तो झोपला असेल, असा घरच्याचा समज होता, मात्र घरी न येता तो दुचाकीवरून गावच्या बाजूलाच असलेल्या डोंगरावरील मळी नावाच्या शेतात गेला. त्याने तेथे झाडाला गळफास घेतला.

भाऊ अनिल यादव याने राधानगरी पोलिस ठाण्यात वर्दी दिली. पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. दुपारी अंत्यसंस्कार केले. त्याच्या वडील व भावाने फोडलेला हंबरडा हृदय हेलावणारा होता. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

नोकरीचीच चर्चा
गेले काही दिवस तो मराठा आरक्षणावरून सरकारी नोकरीबाबत वारंवार चर्चा करत होता. सरकारी नोकरी नसल्याने तो नाराजही होता. असे त्याच्या अनेक मित्रांनी सांगितले. या गावातील बेरोजगार तरुणाने केलेली ही पहिली दु:खद घटना असून, शासनाने तातडीने आरक्षणावर तोडगा काढावा, असे सरपंच विष्णुपंत एकशिंगे यांनी व्यक्त केले.

Web Title: Suicide incidence in Radhanagari Taluka