आजारपणाला कंटाळून त्याने स्वतःवरच केले वार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

सायगाव - मर्ढे (ता. सातारा) येथील जगेश महिपती शिंगटे (वय 25) याने आजारपणाला कंटाळून विष घेऊन व चाकूने स्वतःवर वार करून आत्महत्या केली.

सायगाव - मर्ढे (ता. सातारा) येथील जगेश महिपती शिंगटे (वय 25) याने आजारपणाला कंटाळून विष घेऊन व चाकूने स्वतःवर वार करून आत्महत्या केली.
विरमाडे  (ता. वाई) येथील भर्गोराम मंदिरालगत असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामी समाधीजवळ हा प्रकार उघडकीस आला. जगेश काल मध्यरात्री दुचाकीवरून या मंदिराजवळ आला. शेतीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध त्याने प्यायले. त्यानंतर दोन्ही हातांच्या शिरा कापून घेतल्या, तसेच छातीवर चाकूने तीन वार करून घेतले. त्याचा मृतदेह पाहून ही हत्या की आत्महत्या, असे संशयास्पद वातावरण तेथे निर्माण झाले होते. मात्र, जगेश याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. "आपण आपल्या शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून आत्महत्या करत असून, माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये. माझ्या आजारपणास आतापर्यंत भरपूर खर्च झाला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे,‘ असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
 

पुणे येथे नोकरी करणारा जगेश हा मर्ढे येथील महिपती शिंगटे यांचा द्वितीय मुलगा आहे. मोठा व धाकटा मुलगा कामानिमित्त मुंबई येथे असतात, तर आई-वडील साताऱ्यात (करंजे) वास्तव्यास आहेत. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. परवाच तो मर्ढे येथे आपल्या चुलत्यांकडे जेवण करून मित्राकडे निघलोय, असे सांगून बाहेर पडला होता. मात्र, असे काही तो करेल, असे कोणालाही वाटले नाही, असे त्याचा चुलतभाऊ अजय शिंगटे याने सांगितले.
सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना प्रथम त्याचा मृतदेह दिसला. त्यांनी त्याबाबतची माहिती भुईंज पोलिसांना कळविली. 

पोलिसांनी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार तपास करीत आहेत.

Web Title: suicide in satara