सातारा ‘हॉट...’ रस्त्यावर ‘शुकशुकाट’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतो आहे. निवडणुकीच्या वातावरणाने आधीच तापलेला सातारा आता उन्हाने ‘हॉट’ होत आहे. साताऱ्याचे तापमान आज ३९ अंशांवर पोचले असून, दहा एप्रिलपासून ४० आणि त्यापुढेही तापमान जाण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सातारा - उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतो आहे. निवडणुकीच्या वातावरणाने आधीच तापलेला सातारा आता उन्हाने ‘हॉट’ होत आहे. साताऱ्याचे तापमान आज ३९ अंशांवर पोचले असून, दहा एप्रिलपासून ४० आणि त्यापुढेही तापमान जाण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सकाळी ११ नंतर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.

गेल्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता वाढली असून, तप्त झळा सर्वांना भाजून काढत आहेत. सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. ती सायंकाळी पाचपर्यंत कमी होत नाही. सकाळी कार्यालये, शाळा भरल्या की ११ नंतर रस्त्यावर वर्दळ अगदीच कमी जाणवते. दुपारी तर कायम रहदारीच्या रस्त्यावरही तुरळक वाहने आणि नागरिक दिसतात. सध्या उन्हाची तीव्रता एवढी आहे, की नागरिक कामाव्यतिरिक्त बाहेर जाण्याचे कटाक्षाने टाळत आहेत. बाहेर पडावे लागलेच तर उन्हापासून वाचण्यासाठी बंदोबस्त करूनच बाहेर पडतात. डोक्‍यावर टोपी, बरोबर अनेकजण छत्रीचाही आसरा घेतात. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता साताऱ्याचा पार ३९ अंश सेल्सियसवर पोचला होता. आगामी काही दिवसांत या तापमानात वाढ होणार असून, पारा ४० किंवा त्यापुढेही जाण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

या उन्हाचा त्रास प्रौढांना होत आहेच; मात्र जास्त त्रास छोट्या मुलांना, बालकांना होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. सध्या बालकांच्या सर्दी, खोकल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडावा मिळावा यासाठी थंड पदार्थ खाण्याकडे कल वाढलेला असला तरी ते अपायकारक ठरू लागले आहेत. त्यामध्ये बालकांचे प्रमाण जास्त असते. सरबत, बर्फाचे गोळे, निकृष्ट दर्जाची पेये, ग्रामीण भागात मिळणारे गारीगार आणि 
आइस्क्रीमच्या कांड्या तयार करताना पाण्याच्या शुद्धतेचे प्रमाण तपासणे आवश्‍यक आहे. अन्यथा पाण्याद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांना आमंत्रणच मिळते. जुलाबाचा त्रास उद्‌भवू शकतो, त्यामुळे मुलांना हे बर्फाचे गोळे खाण्यापासून रोखावे, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी नमूद केले. वाढत्या उन्हामुळे तहान वाढणे, जुलाब, खोकला, उलट्या, पोटाचे आजार होतात. मुलांना उन्हात नेताना टोपीचा वापर करावा, असेही डॉ. गोडबोले यांनी सांगितले. 

उन्हाची तीव्रता वाढली की, नागरिकांचा कल थंडपेयांकडे साहजिकच वाढतो. त्यामुळेच रसवंतीगृहांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बहुतेक रसवंतीगृहात बर्फाचा वापर केला जातो. अनेकवेळा हा बर्फ एखाद्या पोत्यात घालून तेथेच कोठेतरी जमिनीवर ठेवलेला असतो. त्याच्या स्वच्छतेचीही फारशी काळजी घेतली जात नाही. तसेच बर्फ कदाचित स्वच्छ असेल पण शुद्धपाण्यापासून केला असलेच याची शाश्‍वती देता येत नाही. यामुळे नागरिकांनी बर्फाचा वापर कटाक्षाने टाळण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

...हे करा
  थंड पाण्यासाठी माठाचा वापर करा. माठात वाळा घालावा 
  २४ तासांत दीड ते तीन लिटर पाणी प्या 
  घरातून निघताना १-२ ग्लास पाणी प्या 
  सोबत पाण्याची बाटली बाळगा. टोपी, गॉगल वापरा
  पांढऱ्या अथवा लाइट शेड (रंगाचे) कपडे वापरा
  रसदार फळे खावीत

...हे करू नका
  बाहेरचे पाणी शक्‍यतो टाळावे 
  फ्रीजमधील थंड पाणी शक्‍यतो टाळा
  बर्फ घातलेला रस, कृत्रिम रंग घालून बनविलेले फळांचे ज्यूस पिऊ नये 
  उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका.

Web Title: Summer Heat Temperature Increase