उन्हाचा कडाका; शीतपेयांना मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

ताकारी - परिसरात उन्हाचा तीव्र कडाका वाढला आहे. उन्हाची तिरीप आणि उकाडा वाढत असल्याने ग्रामीण भागातील दैनंदिन कामांच्या वेळात बदल झाले आहेत. माठ, शीतपेये, कलिंगड यांच्या विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. 

ताकारी - परिसरात उन्हाचा तीव्र कडाका वाढला आहे. उन्हाची तिरीप आणि उकाडा वाढत असल्याने ग्रामीण भागातील दैनंदिन कामांच्या वेळात बदल झाले आहेत. माठ, शीतपेये, कलिंगड यांच्या विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. 

उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतमजूर सकाळी लवकर कामाला सुरवात करीत आहेत. दुपारी उन्हाच्या वेळेत विश्रांती घेऊन संध्याकाळी उशिरापर्यंत शेतात थांबत आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या वेळेत रस्त्यावरील वर्दळ रोडावली आहे. पहाटे व सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पिकांनाही उन्हाची झळ लागत असल्याने जादा पाणी देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. 

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरत आहेत. शाळा सुटल्यानंतर मुले पोहण्यासाठी विहिरींवर गर्दी करीत आहेत. नव्याने पोहायला शिकणाऱ्या मुलांच्यातही उत्साह आहे. बाजारपेठेत माठ विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. छोट्या मोठ्या आकारातील नळ असलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शीतपेयांच्या दुकानात वर्दळ वाढली आहे. आठवडा बाजारात कलिंगडांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. बर्फाच्या लादीवर कापून ठेवलेल्या कलिंगडांच्या फोडी ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. आइस्क्रीम विक्रेत्यांच्या फिरत्या गाड्याभोवती मुलांची गर्दी आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, मोठे रुमाल, गॉगल विक्रीला प्रतिसाद आहे. वर्षभरात वापरण्यात येणारे उन्हाळी साहित्य बनवण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. वेगवेगळ पापड, वेफर्स, कुरवड्या, शेवया, चटणी तयार करण्यात महिला व्यस्त आहेत. कडक उन्हाचा फायदा घेत महिलांनी मोठी धुणी, अंथरुण, पांघरुण धुण्याची कामे सुरू केली आहेत. नदी, ओढ्यावर धुणी धुण्यासाठी ग्रामस्थांची 
गर्दी आहे. 

Web Title: summer increase cold drink demand expand