कणकवलीत फेब्रुवारीत जातीअंताची परिषद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

खोची : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कणकवली येथे सत्यशोधक जन आंदोलन संघटनेच्या सहकार्याने जाती अंताची राज्यव्यापी परिषद घेणार आहे. राज्यातील सर्व श्रमिकांना संघटित करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. 

खोची : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कणकवली येथे सत्यशोधक जन आंदोलन संघटनेच्या सहकार्याने जाती अंताची राज्यव्यापी परिषद घेणार आहे. राज्यातील सर्व श्रमिकांना संघटित करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. 

लाटवडे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील आंबोळी वसाहतीत श्रमिक मुक्ती दलाचे बावीसावे राज्य अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात चार ठरावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा, खानदेश ,पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण या भागातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 
अधिवेशनात संमत झालेले ठराव असे, समन्यायी पाणी वाटप आणि सार्वत्रिक बंद पाईप पाणी वितरणाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा. प्रत्येक कुटुंबाला पाच हजार घन मीटर पाणी द्यावे. तरच सक्तीचे स्थलांतर थांबेल व आत्महत्या थांबतील. उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नसेल तर फरकाची रक्कम सरकारने शेतकऱ्यांना द्यावी. तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत सुरू राहील. खात्रीच्या पाण्याचा उपयोग करून अत्याधुनिक कृषी उद्योग निर्मितीसाठी होणाऱ्या शेतकरी- कष्टकऱ्यांच्या सामुदायिक प्रयत्नांना सरकारने बीज भांडवल अनुदान म्हणून द्यावे. आणि विकासाचा नवा समृध्द मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहन द्यावे. धरण-प्रकल्पग्रस्त जनतेच्या शेतीला पाणी मिळेपर्यंत दरमहा पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा, असे चार ठराव अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संमत करण्यात आले. 

तसेच आजरा येथे झालेल्या वार्षिक अधिवेशनात संमत झालेले सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलनाला वर्षभरात मरगळ आली आहे. यासाठी श्रमिक मुक्ती दल सर्व संबंधित घटकांना सक्रिय होण्याचे आवाहन करणार आहे, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. 

चार फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन 
अधिवेशनात मांडलेल्या चार ठरावांबाबंत चार फेब्रुवारीपासून राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर स्त्री-पुरुष हजारोंच्या संख्येने बेमुदत ठिय्या आंदोलन करतील.

Web Title: summit in kankavali against Castism