सुंदरगड टाकतोय श्रमदानातून कात

सुंदरगड - श्रमदानातून गडावर सुरू असलेले काम.
सुंदरगड - श्रमदानातून गडावर सुरू असलेले काम.

पाटण - स्वराज्यात टेहेळणी गड म्हणून चोख कामगिरी बजावणाऱ्या दातेगड तथा सुंदरगडावर झालेल्या दुर्ग संमेलनानंतर गडाचे रूपडे पालटू लागले आहे. काळाच्या ओघात दडपल्या गेलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा गडप्रेमी, इतिहास संशोधकांच्या श्रमदानातून पायऱ्याच नव्हे तर शिबंद्या, वटे, भुयारे, गुहा, पाणी साठवण्याचे थारोळे (टाक), कोंडवाडे, नजरबाजांसाठी टेहेळणीसाठीची बंकर्स नजरेस येऊ लागली आहेत. लोकसहभागातून सुंदरगड कात टाकू लागल्याने गडाचे रूप बदलू लागले आहे. 

स्थापत्यशास्र कलेचा सुंदरगड म्हणजे शास्रशुध्द अनमोल ठेवा आहे. वास्तुशास्त्रानुसार वैश्विक ऊर्जेचा तो सकारात्मक स्रोत आहे. पूर्वाभिमुखी सुंदरगड गजानन, ईशान्यमुखी वीर हनुमानाची आकर्षक मूर्ती, भव्य तलवार आकाराची विहीर, त्यामध्ये नंदी, समोर शिवलिंग स्थापित गुंफा वजा शिवमंदिर, क्षणभर शिवलिंगासमोर डोळे मिटून उभे राहिले असता कैलासाचा प्रत्यक्ष भास व्हावा असा अनुभव येतो. गडाच्या आजूबाजूस वनसंपदा वनौषधींनी गर्दी केली आहे. गडावर तसेच परिसरात विपुल प्रमाणात दवणे आढळते.

याठिकाणी चौथे दुर्ग संमेलन घेण्यात आले होते. तेव्हापासून या गडाच्या संवर्धनाला वेग आलेला आहे. पाटणसह परिसरातील युवकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. दर रविवारी तेथे श्रमदान केले जाते. त्यात यशवंतराव जगताप, मनोहर यादव, शंकरराव कुंभार, शंकर मोहिते, महादेव खैरमोडे, काशिनाथ विभूते, लक्ष्मण चव्हाण, चंद्रहार निकम, अनिस चाऊस, नीलेश फुटाणे, रामभाऊ साळुंखे, अविनाश पराडकर, अनिल बोधे आदींचा सक्रिय सहभाग आहे. दुर्ग संवर्धनाच्या कामासाठी सर्वजण एक झाले आहेत. गडावर राबता राहण्यासाठी सर्व सण-उत्सव गडावर करण्याचे ठरवण्यात आले आहे.

गडावर घेण्यात आलेल्या शिवकाव्य संमेलनासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुर्ग संमेलन व त्यानंतर संवर्धनाचे सुरू असलेले काम यामुळे याठिकाणी पर्यटकांचाही ओघ वाढला आहे. तलवारीच्या आकाराची विहीर 
हे या ठिकाणचे खास आकर्षण असून, परिसरातील मोठ्या प्रमाणात फुललेली फुलेही पर्यटकांना आकर्षित करतात. इतिहास संशोधकांची पावले सुंदरगडाकडे वळत असून, सुंदरगडाची महती राज्यभर पसरू लागली आहे.

स्थानिक ग्रामस्थांचाही यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग आहे. सर्वांच्या सहकार्याने सुंदरगड ऐतिहासिक पर्यटन ठिकाण म्हणून उदयास येत आहे.

दुर्ग संमेलनानंतरच गडाच्या संवर्धनाला सुरवात झाली. गेले वर्षभर हे काम सुरू आहे. दर रविवारी सकाळी मावळ्यांची पावले आपोआप गडाकडे वळत असून, त्याठिकाणी श्रमदान करत आहेत. हजारो मावळ्यांच्या श्रमदानाने भविष्यात सुंदरगडाला वेगळे महत्त्व प्राप्त होईल.
- अनिल बोधे, गडप्रेमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com