कोल्हापूरः बॅंकांना फसविणारी नऊ जणांची टोळी जेरबंद

कोल्हापूरः बॅंकांना फसविणारी नऊ जणांची टोळी जेरबंद

कोल्हापूर - ‘सोने तारण देऊन विविध बॅंकांना लाखोंचा गंडा घालणारी नऊ जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. टोळीने दोन किलो नऊ ग्रॅम सोने तारण ठेवून ३९ लाखांहून अधिकच्या कर्जाची बॅंकेतून उचल केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, वीरशैव बॅंक आदींसह आठ बॅंका व पतसंस्थांचा फसवणूक झालेल्यांमध्ये समावेश आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित बॅंकेचे सराफही रडारवर असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. प्रसंगी त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अटक केलेल्यांमध्ये चंद्रकांत शिवराम भिंगार्डे (वय ५५, फुलेवाडी), अतुल निवृत्ती माने (२९), विलास अर्जुन यादव (४५, गणेशवाडी, ता. करवीर), अमर दिनकर पाटील (२८, शिरोली दुमाला, करवीर), भारती श्रीकांत जाधव (४५, साई कॉलनी, पाचगाव), कविता आनंदराव राक्षे (३८, सुभाषनगर, कोरेगाव, सातारा), विक्रम मधुकर कोईगडे (३०, माळी गल्ली, शिरोली दुमाला, करवीर), राकेश रजनीकांत रणदिवे (४१, रा. गंगावेश), पृथ्वीराज प्रकाश गवळी (२८, गणेशनगर, शिंगणापूर) यांचा समावेश आहे.

सोन्याचा मुलामा असलेले दागिने सातारा येथील संशयित कविता राक्षे हिच्याकडून घेऊन टोळीने बॅंका, पतसंस्थांसह सराफांकडे ते गहाण ठेवले. सोने प्रथमदर्शनी खरे असल्याचा शेरा बॅंकांच्या सराफांनी मारला. त्याचबरोबर सोने अनेक ठिकाणी मशिनद्वारेही तपासले; मात्र सोने तारण कर्जाची मुदत संपल्यानंतरही सोने सोडविण्यासाठी कोणी येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. जिन्नस मोडताना फक्त एक ग्रॅम, तीन ग्रॅम इतकेच वजन असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संशयित तानाजी केरबा माने (४६, गणेशवाडी, करवीर) याचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत तपास करीत आहेत.

अशी झाली फसवणूक
बॅंकेचे नाव     सोने ग्रॅम     रक्कम 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक 
(शाखा शिरोली दुमाला, कसबा बीड)                                   ३०६     ५,४४,५००
आयसीआयसीआय बॅंक (शाखा कोतोली, बाजार भोगाव, घोटवडे, पन्हाळा)                     ७९३    १४,४३,४६२
वीरशैव बॅंक (साने गुरुजी, राशिवडे, राधानगरी)    २२७    ४,०७,०००
राजे विक्रमसिंह घाटगे बॅंक, कागल 
(शाखा बाचणी, कागल)                                                  ३००    ६,००,०००
दर्शन पतसंस्था, महाराणा प्रताप चौक    ३५२    ७,६७,०००
भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स, पाचगाव
(प्रोप्रा. दिनेश वेलकंद गांधी-ओसवाल)                                   ९३     १,४०,०००
शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स 
(बाबासाहेब शेळके, माळ्याची शिरोली)                                     ७     १२,०००
महालक्ष्मी ज्वेलर्स, बालिंगा 
(प्रोप्रा. सीताराम देसाई-राठोड)                                             ११    १८,०००
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com