भोंदूबाबांना ठेचण्याची जरुरी 

संजय शिंदे 
बुधवार, 15 मार्च 2017

सुरूर (ता. वाई) येथे भोंदूबाबावर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने कायद्याची पावले उचलूनही समाजातून अद्याप बुवाबाजीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. त्या उलट त्यांचे प्रस्थ वाढतानाच दिसते. त्यामुळे आता भोंदूबाबांना ठेचून काढण्याची जरुरी आहे. फक्त "अंनिस'कडून हे अपेक्षित न ठेवता सर्व समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. 

सुरूर (ता. वाई) येथे भोंदूबाबावर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारने कायद्याची पावले उचलूनही समाजातून अद्याप बुवाबाजीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. त्या उलट त्यांचे प्रस्थ वाढतानाच दिसते. त्यामुळे आता भोंदूबाबांना ठेचून काढण्याची जरुरी आहे. फक्त "अंनिस'कडून हे अपेक्षित न ठेवता सर्व समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे. 

बुवाबाजीचे प्रकार अनेक गावांत उघडकीस आलेत. मात्र, त्यापासून बोध न घेता अजूनही भोंदूबाबांकडून पैशाची लूट, महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडताना दिसतात. विशेषतः ग्रामीण भागांत बुवाबाजी कायम आहे. भोळ्या भाबड्या जनतेत अजूनही अंधश्रद्धा आहे. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक भोंदूंनी आपले प्रस्थ वाढवले आहे. यापूर्वी भोंदूूबाबांनी फसवणूक केल्याचे प्रकार घडूनही त्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनांमुळे शहरात त्यांना त्यांचा "धंदा' चालवताना मर्यादा येतात. त्यामुळे बहुतांश भोंदूबाबांनी खेड्याकडे आपले प्रस्थ वाढविण्यास सुरवात केली आहे. अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यांचे काही हस्तक भोंदूबाबांविषयी खोट्या अफवा पसरवतात. जेणेकरून या बाबांकडे लोक आकर्षित व्हावेत, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. सध्याच्या धकाधकीच्या युगात सुख, शांतता मिळवण्यासह आपली समस्या दूर व्हावी, म्हणून बरेच जण अशा भोंदूगिरीवर विश्‍वास ठेवतात. आजही काही गावांमध्ये त्यांना भेटण्यासाठी ठराविक वार ठरलेले आहेत. त्याच दिवशी दूरचे लोक समस्या घेऊन जातात. हजारो रुपये त्यांच्या पायावर ठेवतात. दुर्दैवाने एखाद्याची समस्या सुटली नाही, फसवणूक होऊन लुबाडणूक झाली तरी अशा भोंदूविरुद्ध पोलिसांत जाण्याचे धाडस फारच कमी लोक दाखवतात. समाजात आपली नाचक्की होईल, पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीपोटी काही जण गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांचे फावते. त्यातूनच त्यांचे धाडस वाढून पुन्हा फसवणूक करण्याचे प्रकार वाढतात. बुवा-बाबांकडून लैंगिक, शारीरिक, आर्थिक शोषण होऊनही अनेकदा महिला गप्प बसतात. त्यामुळे भोंदूबाबांवर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याकरता वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे अशा भोंदूबाबांना पकडण्यासाठी सकारात्मक काम करत आहे. त्याला समाजाने पाठबळ दिले पाहिजे. तरच अशा प्रकारांना पायबंद बसेल. अन्यथा, आज सुरूर येथे कारवाई झाली तरी उद्या दुसऱ्या गावांत भोंदूबाबांचे फसवणुकीचे प्रकार चालूच राहतील. 

Web Title: superstition eradication issue