सुप्रिया सुळे कर्मवीर पुण्यतिथीत खाली, तर संकुल उद्‌घाटनावेळी बसल्या मागे

Supriya Sule while sitting behind the inauguration
Supriya Sule while sitting behind the inauguration

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय ताकद मोठी आहेच. पण, त्यापेक्षाही त्यांच्या मनाचा मोठेपणा राजकारणात सातत्याने दिसून येतो. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली गादीवर, तर केशवराव पाटील व्यापारी संकुलाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात मागील दुसऱ्या रांगेत बसून मनाचा मोठेपणा दाखवून दिला. 

शरद पवार यांची कन्या म्हणून सुप्रिया सुळेंचा एक वलय असलातरी राजकारणातील पोच, अभ्यास आणि कर्तृत्व हे त्यांचे स्वत:चे गडद वलय आहेच. राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार, अजित पवार यांच्याबरोबरीने सुप्रिया सुळेंचे चालते. पक्ष बांधणीतही त्या अग्रेसर असल्याने पक्षातील त्यांची ताकद लक्षणीय आहे. राष्ट्रवादीची राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नावही चर्चिले जाऊ शकते. त्याला त्यांची राजकीय ताकद हे कारण असलेतरी मनाचा मोठेपणा कारणीभूत आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल कायम आपुलकी असते. 

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात पवार घराणे नेहमीच हजर असते. तसे पाहिले तर रयत संस्थेवर पवार घराण्यांचे प्राभल्यही आहे. मात्र, त्याचा गर्व या घराण्याला दिसत नाही. आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, बबनराव पाचपुते, "रयत'चे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह आजी-माजी आमदार, "रयत'चे पदाधिकारी खुर्चीवर आसनस्थ झाले होते. मात्र, सुप्रियाताई खुर्चीवर न बसता शेजारी टाकलेल्या गादीवर हसतमुखाने विराजमान झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी विभागीय आयुक्‍त प्रभाकर देशमुख हेदेखील बसले. 

सदरचा कार्यक्रम संपल्यानंतर हे मान्यवर जिल्हा ग्राहक संघाच्या केशवराव पाटील व्यापारी संकुल इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमास पोचले. त्यावेळी सुप्रिया सुळे व्यासपीठावर जाऊन दुसऱ्या रांगेतील खुर्चीवर बसल्या. त्यावर आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार, रामराजे, वळसे-पाटील, अजित पवार यांच्याबरोबरीने पुढील रांगेत बसण्याची विनंती केली. मात्र, सुप्रिया सुळेंनी त्यांनाच पुढे बसण्याचा आग्रह धरला. 

त्यांच्या मनाचा मोठेपणा माहित असलेल्या अजित पवारांनी "मकरंद तुम्ही पुढे बसा, ती बसणार नाही पुढे,' असे सांगून मकरंद पाटलांना पहिल्या रांगेत बसविले. यापूर्वीही जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांत सुप्रिया सुळे यांनी स्थानिक आमदारांना मोठेपणा देत असतात. त्यामुळे सहाजिकच सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आपुलकीही पक्षात वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com