कागलमध्ये तरुणाचा खून

कागलमध्ये तरुणाचा खून

कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबतची नोंद करण्याचे काम कागल पोलिस ठाण्यात सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मृत घाटगे आणि संशयितांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. 

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की सूरज घाटगे  कुटुंबासोबत अंबीलकट्टी येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाजवळ राहत होते. ते एमआयडीसीत नोकरीसह चालकाचेही काम करत. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक महिन्याची मुलगी आहे. आज सायंकाळी ते घरात बसले होते. त्यांची आई सुरेखा व पत्नी दर्शनी या दोघी बाळाला आंघोळ घालण्यासाठी पाणी तापवण्याच्या तयारीत होत्या.

दरम्यान, सूरज यांच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यांनी आपल्या पत्नीला बाहेर जातो असे सांगितले. त्यानंतर लगेच सूरज बाहेर पडले. सुमारे एक किलोमीटर दूर अंतर ते गेल्यानंतर मोटारसायकलवरून तीन तरुणांनी घाटगे यांना गाठले. त्या तिघांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरवात केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.

याची माहिती नातेवाइकांना समजली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली; पण त्यापूर्वी हल्लेखोर पसार झाले होते. जखमी सूरज यांना नातेवाइकांनी खासगी वाहनातून तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सूरज यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. कागल पोलिसांनीही सीपीआरमध्ये धाव घेतली.

सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
सूरज घाटगे हा कागल औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कारखान्यात नोकरी करीत होता. त्याचे वडील कागल नगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागाकडे नोकरी करतात. आई घरकाम करते. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले असून महिन्याची मुलगी आहे. सूरज घाटगे व हल्लेखोर तरुणांमध्ये वाद होता. यातून त्यांच्यात बाचीबाची झाली होती. घटनास्थळावरील साक्षीदार, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com