सुरेश पाटील विषबाधा प्रकरण चिघळण्याची चिन्हे

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

सोलापूर -  माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिल्याने नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून सुमारे 500 ते 600 पानांची माहिती तयार ठेवली आहे. पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण थंडावले असल्याचे वाटत असताना कागदपत्रांची मागणी केल्याने पुन्हा हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. 

सोलापूर -  माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिल्याने नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून सुमारे 500 ते 600 पानांची माहिती तयार ठेवली आहे. पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण थंडावले असल्याचे वाटत असताना कागदपत्रांची मागणी केल्याने पुन्हा हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. 

विषबाधाप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती मागितली आहे. त्यांना देण्यासाठी कागदपत्रे हवी आहेत, असे पत्र पाटील यांनी  नगरसचिव कार्यालयास दिले. त्यानंतर दिवसभर धावपळ करून नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाटील यांनी मागितलेल्या पत्रांच्या छायांकित प्रती तयार ठेवल्या आहेत. आणखीन प्रती काढण्याचे काम रात्री  उशिरापर्यंत सुरू होते. यापूर्वीही पाटील यांनी 7 आणि 12 जानेवारीला पत्र दिले होते. त्याची दखल न घेतल्याने पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. 

मार्च ते डिसेंबर 2017 या कालावधीत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या शासकीय दौऱ्याची माहिती, त्यावेळी झालेला खर्च, घेतलेला ऍडव्हान्स, जमा केलेली परतव्याची रक्कम याची माहिती देण्याची मागणी केली आहे. महापालिका सभेच्या वेळी कोणत्या पदाधिकाऱ्यांनी ऐच्छिक निधीतून अल्पोपहार व इतर खाद्य व पेय मागविले त्याची तपशीलवार माहिती, महापौर कार्यालय, महापौर निवास, समिती सभागृह येथे कोणत्या बैठका झाल्या, त्याची कारणे कोणती होती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा निश्‍चित करतवेळी जागा पाहणी करताना व निश्‍चित करताना झालेल्या बैठकीवेळी मागविलेला अल्पोपहार व जेवणाच्या बिलाची छायांकित प्रत द्यावी, महापालिकेने पदाधिकाऱ्यांना वाहने उपलब्ध करून दिली आहेत, त्यांना किती इंधन देण्यात आले याची तपशीलवार माहिती द्यावी, तसेच इंधन कोणाकडून घेण्यात आले त्याची माहिती द्यावी, मागणी केलेल्या कालावधीत स्थायी समिती व सर्वसाधारण समितीच्या सभांची कार्यपत्रिका द्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 

परदेश दौऱ्याचीही मागितली माहिती 
प्रस्तावित कालावधीत महापौरांनी कोणकोणत्या परगावांना भेट दिली, त्यांचे किती परदेश दौरे झाले, कोणत्या कारणासाठी त्यांनी भेट दिली, त्यांच्यासमवेत कोणते सदस्य गेले, अन्य व्यक्ती गेल्या होत्या का, त्यांनी कोणाच्या खर्चाने परदेश दौरा केला, महापालिकेच्या खर्चाने केला असेल तर किती रक्‍कम ऍडव्हान्स घेण्यात आली, त्याचा जमा-खर्च झाली आहे का, याची तपशीलवार मागणी पाटील यांनी केली आहे. 

या हॉटेलमागे ससेमिरा लागण्याची शक्‍यता 
प्रस्तावित कालावधीत मंजू हॉटेल, अन्नपूर्णा स्वीट होम, पार्क चौकातील हॉटेल सावजी, श्रवण सावजी, स्वस्तिक हॉटेल, प्रियंका हॉटेल, मदिना हॉटेल, सुगरण हॉटेल, यश पॅलेस हॉटेल, आनंद हॉटेल, स्नो मॅन्स ज्यूस सेंटर येथून खाद्य व पेय पदार्थ मागविण्यात आले आहेत. त्यांच्या बिलाची छायांकित प्रत द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या हॉटेलचालकांच्या मागे आता पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Web Title: Suresh Patil poisoning case in solapur municipal corporation