काँग्रेस आमदाराच्या पत्नी, भावाचे मतदान भाजप ताराराणी आघाडीलाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

या लढतीतही संजय मोहिते यांनी कमलाकर भोपळे यांचा 43 विरुध्द 32 मतांनी पराभव केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

कोल्हापूर - महापौरपदी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीच्या सूरमंजिरी लाटकर यांची 43 विरुध्द 32 मतांनी निवड झाली. त्यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदीही कॉग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संजय मोहिते आणि भाजप ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांच्यात लढत झाली. दरम्यान या निवडणूकीत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व भावाने मात्र भाजपलाच मतदान केले. याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. 

या लढतीतही संजय मोहिते यांनी कमलाकर भोपळे यांचा 43 विरुध्द 32 मतांनी पराभव केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात ही सभा झाली. निवडीनंतर लाटकर आणि मोहिते यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि प्रचंड घोषणाबाजी करत विजयी मिरवणूक काढली.  

उच्चशिक्षीत महिला महापालिकेच्या महपौरपदी

महापौरपदासाठी सत्तारुढ कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधी भाजपा ताराराणी आघाडीत ही नेहमीच लढाई होत असते. यापुर्वीही ऍड.सूरमंजिरी लाटकर यांचे नाव दोनवेळा ऐनवेळी मागे पडले होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लाटकर यांच्या महापौरपदाची उत्कंठा लाटकर त्यांचे कुटूंबिय आणि समर्थकांना लागून राहिली होती. लाटकर या विचारेमाळ या प्रभागातून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यांच्या रुपाने एक उच्चशिक्षीत महिला महापालिकेच्या महपौरपदी विराजमान झाल्या आहेत. 

उपमहापौरपदी कॉग्रेसचे संजय मोहिते

81 सदस्यसंख्या असलेल्या या सभागृहात शिवसेनेचे नियाज खान, अभिजीत चव्हाण, राहूल चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे या तसेच ताराराणी आघाडीच्या तेजस्विनी इंगवले या गैरहजर राहिल्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शमा मुल्ला यांचेही नगरसेवकपद नुकतेच रद्द झाले आहे. त्यामुळे 81 पैकी 75 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. उपमहापौरपदासाठीही कॉग्रेसच्या संजय मोहिते यांना 43 तर विरोधी भाजप ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांना 32 मते मिळाली. 

दोघांनी फेटे घातले नाहीत. 
दोन्ही कॉग्रेसचे सर्व नगरसेवक,नगरसेविका यांनी फेटे घालून सभागृहात प्रवेश केला. तसेच फेटे परिधान करुनच ते सभागृहात बसले होते. पण राष्ट्रवादीचे नगरसेवक मुरलीधर जाधव, तसेच स्विकृत नगरसेवक प्रा.जयंत पाटील यांनी मात्र फेटे परिधान केले नव्हते. या दोघांचाही लाटकर यांना पुर्वीपासून विरोधच होत. यापैकी प्रा. पाटील हे स्विकृत नगरसेवक असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण मुरलीधर जाधव यांनी फेटा परिधान केला नसला तरी मतदान मात्र आघाडीच्य उमेदवार लाटकर यांनाच केले. 

काँग्रेस आमदाराच्या पत्नी, भावाचे मतदान भाजप आघाडीला 
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे नूतन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री आणि त्यांचे भाऊ संभाजी जाधव यांनी आज काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसऐवजी भाजप ताराराणी आघाडीच्याच उमेदवारांना मतदान केले.  ते काय करतात याबाबात उत्सुकता होती. मात्र ते 2010 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजपच्या तिकिटावरच निवडून आल्याने त्यांनी या आघाडीलाच मतदान केले आहे. याबाबत आमदार चंद्रकांत जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, ते ज्या पक्षातून निवडून आले आहेत. त्या पक्षासोबतच ते राहिले पाहिजेत म्हणून त्यांनी ते जेथून निवडून आले तेथेच मतदान केले आहे. असे सांगीतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surmanjiri Latkar Elected As Kolhapur Mayor