नाशिक शहराला घेरले साथीच्या आजारांनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

इमारतींच्या तळघरांत साचलेल्या पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष

नाशिक - धुवाधार पावसानंतर शहराची परिस्थिती पूर्वपदावर येत असताना साथीच्या आजारांनी घेरले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करून आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, तरी डासांची पैदास वाढून रोगराईला निमंत्रण मिळते, अशा शहरातील इमारतींच्या तळघरांत साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ‘सकाळ’तर्फे आज शहरातील विविध भागांत पाहणी करण्यात आल्यानंतर वास्तव समोर आले आहे. 

गोदावरी, नासर्डी नदीच्या पुराच्या पाण्याने पातळी ओलांडून इमारत, रस्त्यांपर्यंत धाव घेतली. पाण्याबरोबर गाळही रस्त्यावर आला आहे. पूर ओसरल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून गाळ धुण्याचे काम सुरू आहे, तर वैद्यकीय विभागाने पूरग्रस्त भागांमध्ये वैद्यकीय पथके पाठवून रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. आरोग्य विभागाने झोपडपट्टी, नदीकाठावर रोगप्रतिबंधक पावडरची फवारणी करून रोगराई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नदीकाठ किंवा झोपडपट्टी भागाकडेच लक्ष दिले जात आहे. शहराच्या उच्चभ्रू भागातील इमारतींच्या तळघरात साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने डासांची पैदास वाढून आजारांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्‍यता आहे. शहरातील मैदानांवर अजूनही पाणी साचले आहे. बंद असलेले बंगले, इमारतींमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचून रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे.

सिडकोत तिघांना डेंगीसदृश आजार

सिडको - परिसरात तिघांना डेंगीसदृश आजार झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सप्तशृंगी चौकातील दोन बहिणींना डेंगीसदृश आजार झाल्याचे समोर आले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी वारंवार आवाज उठवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी गणेश चौकात डेंगीसदृश आजाराचे अनेक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर प्रभाग ४२ मधील सप्तशृंगी चौकातील दोन बहिणींना डेंगीसदृश आजार झाल्याचे समोर आले आहे. यातील एक मुलगी दहावीत, तर दुसरी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात दोघींवर उपचार सुरू असल्याचे समजते. उत्तमनगर भागातही डेंगीसदृश आजाराचा रुग्ण आढळून आला आहे.

Web Title: Surveillance of diseases besieged city of Nashik