राज्यातील 40 हजार गावात गावठाण मोजणी ड्रोनव्दारे सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भूमि अभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा शिवाजी विद्यापीठ क्रीडांगणावर आयोजित केल्या असून या स्पर्धांचा प्रारंभ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, आंतरराष्ट्रीय नेमबाज सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत आदी उपस्थित होते.

राज्यातील गावठाणांची मोजणी अधिक सोपी आणि अचूक करण्यावर राज्य शासनाने भर दिला असल्याचे सांगून महसूलमंत्री पाटील म्हणाले, मोजणी करण्याच्या पध्दतीमध्ये वेळोवेळी राज्य शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुधारणा केल्या आहेत. सध्या ड्रोनच्या सहाय्याने मोजणी केली जात आहे. यापुढील काळात लँड टायटल बील आणून लोकांना मालकी हक्क  देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हा उपक्रम देशातील एक अभिनव उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी महसूल गोळा करण्याबरेाबरच लोकांना समाधान कसे मिळेल या दृष्टिनेही आपल्या कामकाजात सुधारणा कराव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महसूल मधील जाचक जूने कायद्यांमध्ये सुधारणा करण्यावर शासनाचा भर असून लोकांना जाचक ठरणाऱ्या कायद्यांमध्ये निश्चितपणे बदल करण्याची भूमिका शासनाने स्विकारली आहे. येत्या वर्षभरात महसूल विभागाचा राज्यभर दौरा करून महसूल विभागातील अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यादृष्टिने या विभागात निश्चितपणे बदल केले जातील, असेही  महसूलमंत्री पाटील म्हणाले.

भूमि अभिलेख क्रीडा स्पर्धासाठी यावर्षी 1 कोटी
भूमि अभिलेख विभागाच्या क्रीडा स्पर्धांसाठी यावर्षी 1 कोटीची तरतूद केली जाईल, अशी घोषणा करून महसूलमंत्री पाटील म्हणाले, शासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शी करताना अधिकारी - कर्मचाऱ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि सांघिक भावना वृध्दिंगत व्हावी, यासाठी या विभागात क्रीडा स्पर्धा होणे गरजेचे आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांची जीवनशैलीत सुधारणा होऊन संयम, शिस्त, शांतता, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमूखता या गोष्टी निश्चितपणे जोपासल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: survey by Drone in 40 thousand villagers in state