जगण्यासाठी माणूसच प्राणी बनतो तेव्हा...

जगण्यासाठी माणूसच प्राणी बनतो तेव्हा...

कोल्हापूर - सर्कशीतल्या वाघ, सिंह, हत्तीचा काळ संपला. सर्कशीच्या जगातला आत्माच त्यामुळे गेला आणि त्याची भरपाई म्हणून सर्कशीत माणूसच जनावराच्या भूमिकेत वावरू लागलाय. येथे सुरू असलेल्या सुपरस्टार सर्कशीत असाच एक चिपांझी आहे. प्रत्यक्षात तो माणूस आहे; पण चिपांझीचा केसाळ वेश अंगावर घेत तो एखाद्या चिपांझीसारखाच वावरत आहे.

जीवघेणा उकाडा आणि त्या उकाड्यात अंगाला घट्ट चिकटणाऱ्या त्या केसाळ वेशात तो चिपांझीच्या भूमिकेत जगत आहे. वरवर चिपांझीसारख्या टिवल्या बावल्या करत सर्कशीच्या तंबूत वावरणारा हा माणूस चिपांझीच्या वेशात घामाने अक्षरशः डबडबलेला असतो. जगण्यासाठी एखादा माणूस कसा घाम गाळतो, याचेच तो त्याक्षणी प्रतीक झालेला असतो. 

चिपांझी या प्राण्याच्या जगण्याच्या धडपडीची ही कथा नाही, तर चिपांझीच्या रूपात जाणाऱ्या एका गरीब माणसाच्या कष्टाची घामाने चिंब भिजलेली ही व्यथा आहे. सर्कशीतील वन्यप्राण्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्कशीतील वाघ, सिंह, हत्ती, घोडे एवढेच काय पोपट, कुत्रे यावरही बंदी आली. सर्कशीचे मुख्य आकर्षणच त्यामुळे संपले.

सर्कस टिकवायची, तसेच सर्कस करताना काही बदल करायची वेळ व्यवस्थापनावर आली आहे. सर्कस बघायला लहान मुले अधिक असतात. त्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी चिपांझीची कल्पना पुढे आली आणि अजय नायक या जोकरवर चिपांझी होण्याची वेळ आली. कायम फजिती वाट्याला येणाऱ्या या जोकरवर चिपांझीची केसाळ वेशभूषा येऊन चिकटली आणि चिपांझीसारखा दिसणारा माणूस म्हणून सर्कशीचे वेगळे आकर्षण, अशी जाहिरात सुरू झाली. अजय नायक हा तंबूभर चिपांझीसारखाच वावरतो.

केवळ मुलांना हसवतो, घाबरवतो असे नव्हे तर आपल्या चिंपाझीसारख्या हालचालीने मोठ्यांनाही क्षणभर धक्का देतो. तो जरुर टाळ्या घेतो; पण खेळ संपला आणि मुख्य तंबूच्या बाहेर छोट्या तंबूत जाऊन जेव्हा तो चिंपाझीचा वेश उतरवतो तेव्हा घामाने अक्षरशः निथळत असतो. फक्त वारा, वारा असेच म्हणत असतो. 

माणूस चिंपाझी झाला, हे या निमित्ताने म्हणायला ठिक आहे; पण सर्कस या क्रीडा व कसरत प्रकाराची कथाच या चिंपाझीच्या मुखवट्याआड दडली आहे. यातला चिंपाझी हे एक प्रतीक आहे; पण सर्कशीतला माणूस कसा जगतो, याचे ते वास्तव आहे. 

सुपरस्टार सर्कस ही एकमेव मराठी माणसाने सुरू ठेवलेली सर्कस आहे. सांगली हा सर्कशीच्या उगमस्थानाचा जिल्हा. तेथील जत माडग्याळच्या प्रकाश माने यांची ही सर्कस आहे. सर्कस जगवणे, टिकवणे ही आमची रोजची सर्कस आहे. सर्कशीत आता प्राणी नाही. मग आम्ही मार्ग काढला. माणसालाच चिपांझी करून पुढे आणला. 
- ज्वालासिंग,
सहायक व्यवस्थापक, सुपरस्टार सर्कस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com