राष्ट्रपतींच्या सहीशिवाय "राजवट' उठविल्याचा संशय ः सुशीलकुमार शिंदे 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

कॉंग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला उशीर झाल्याचा आरोप श्री. शिंदे यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले,""कॉंग्रेसमुळे मुळीच उशीर झाला नाही. उलट सत्ता स्थापन लवकर कशी करता येईल यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याच्या सूचना सोनिया गांधी यांनी अहमद पटेल यांना दिल्या होत्या. त्यानुसार श्री. पटेल यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कॉंग्रेसवर होणारा आरोप चुकीचा आहे.''

सोलापूर ः राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी आवश्‍यक असते. त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी हवी असते. मात्र सत्ता स्थापनेच्या घडामोडी पाहता राजवट उठविण्याच्या आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे की नाही याबाबत शंका आहे, तशा अफवाही सुरु आहेत, असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. 

माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर श्री. शिंदे बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार युन्नुस शेख, माजी आमदार निर्मला ठोकळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

सत्तास्थापनेसंदर्भात झालेल्या घडामोडींबाबत ते म्हणाले,""झालेला प्रकार हा भारतीय घटनेचा खूनच आहे. ज्या पद्धतीने शपथविधी झाला, ते पाहता मंत्रीमंडळाची बैठक झाली की नाही याबाबत साशंकता आहे. आज ते सर्वोच्च न्यायालयात सांगतील अशी अपेक्षा आहे. कोणताही घटनात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्‍यक असते. राजवट उठविण्यासंदर्भातही ही आवश्‍यक होती. सकाळी सात वाजता शपथविधी झाला, याचा अर्थ राष्ट्रपतींनी पहाटे स्वाक्षरी केली असावी का असा संशय आहे. तथापि, त्यांची स्वाक्षरी झालीच नाही, अशी अफवा उठली आहे. पाहू या सत्य लवकरच बाहेर येईल.''  आमदार फोडाफोडीचे जे राजकारण सुरु आहे, त्याबाबत विचारले असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushil Kumar Shinde suspected of raising "rule" without President's signature