सोलापूरात लोकसभेसाठी सुशीलकुमारांची भूमिका निर्णायक

सोलापूरात लोकसभेसाठी सुशीलकुमारांची भूमिका निर्णायक

सोलापूर- गेल्या चार वर्षांत सोलापूर शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही. शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसला आहे, हे कॉंग्रेसच नव्हे तर भाजपमधीलही 
काही धुरिणांचे मत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे राजकीय व्यासपीठावर विरोधक असले तरी, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या कालावधीतही शिंदे खासदार म्हणून सोलापूरसाठी खूप काही करू शकले असते असा मतप्रवाह आज तयार झाला आहे. त्याचा कॉंग्रेसला कसा फायदा होईल हे शिंदे यांच्या भूमिकेवरच ठरणार आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रदेशनिहाय आढावा बैठक घेणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांसाठी गुरुवारी (ता. 15) बैठक होणार आहे. या बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निश्‍चितीची शक्‍यता असल्याने या बैठकीकडे तमाम सोलापूरकरांसह राजकीय विश्‍लेषकांचे लागून राहिले आहे. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाले आहे. विशेषतः खासदार ऍड. शरद बनसोडे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्धांमुळे हा मतदारसंघ भलताच चर्चेत आला. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केल्याने हे प्रकरण मिटले. मात्र, या घडामोडींचा आढावा बैठकीत निश्‍चित चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. 

राज्यसभेचे खासदार अमर साबळे हे भाजपकडून सोलापूरसाठी इच्छुक असल्याची चर्चा रंगली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार ऍड. बनसोडे हे पुन्हा इच्छुक आहेत. श्री. साबळे यांचे नाव चर्चेत येऊ लागल्याने ऍड. बनसोडे चिंतेत आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हेही रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. चर्चेत असलेल्या या दोन्ही नेत्यांनी सोलापूर मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजिण्याचा, तसेच अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. वंचित आघाडीकडून भारिपचे ऍड. प्रकाश आंबेडकर, भाजपसोबत आघाडी असली तरी रिपाइंकडून निवडणूक लढविण्याचा चंग महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी बांधला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे यांचेही नाव चर्चेत येऊ लागले आहे. 

वास्तविक पाहता शिंदे यांना 2014 मध्ये मिळालेल्या मतांची संख्या पाहता 2009 च्या तुलनेत काहीही फरक नव्हता. पडला तो मोदी इफेक्‍टचा, तरीसुद्धा ऍड. बनसोडे यांना मताधिक्‍य मिळण्यामागे कॉंग्रेसमधीलच काहीजणांचा हात होता, हे नंतर स्पष्ट झाले. नंतर ते उघडपणे बोलले गेले, मात्र वेळ निघून गेली होती. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडते हे लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com