सुशीलकुमारांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले : राव 

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

लापूर - ''आपल्या देशात वर्तमानपत्र विकणारा राष्ट्रपती होतो, न्यायालयात शिपाई म्हणून काम केलेली व्यक्ती देशाचा गृहमंत्री होतो हे प्रगल्भ लोकशाहीची लक्षणे आहेत. त्याचेच प्रतीक असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे'', असे गौरवोद्‌गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी काढले. 

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष दीक्षान्त समारंभात सुशीलकुमार शिंदे यांना राव यांच्या हस्ते आज पहिली डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या पदवीवर शिंदे यांच्या आईचे नाव आणि त्यांचा आधार क्रमांक नमूद आहे. तसेच ते डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आले आहे. राज्यात अशी पदवी प्रथमच दिली जात असल्याचा उल्लेख कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी केला. 

संकेतानुसार या कार्यक्रमात राज्यपाल बोलणार नव्हते. मात्र, शिंदे यांच्या खडतर जीवनाबद्दल ऐकून मिळवलेल्या यशाचा उल्लेख असलेला मानपत्रातील मजकूर ऐकल्यावर त्यांना राहावले नाही. पदवी देण्यापूर्वी त्यांनी स्वतः ध्वनिक्षेपक हातात उचलून घेतला आणि आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कुलगुरू डॉ. मालदार, प्रभारी कुलसचिव डॉ. पी. प्रभाकर व परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील उपस्थित होते. 

राव म्हणाले, ''लहानपणी वर्तमानपत्र विकणारे ए. पी. जे. अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती झाले. त्याच धर्तीवर शिंदे यांनी अतिशय खडतर वाटचालीतून जीवनात यश मिळवले. दलित वर्गातील असूनही सर्वसाधारण जागांवरून निवडून येण्याची किमया फक्त शिंदेच करू शकतात. माझे आणि त्यांचे अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहेत.'' देशातील विविध विद्यापीठांतर्फे मला डॉक्‍टरेट मिळाली; पण आज मिळालेली पदवी ही माझ्या 'आई'ने दिली आहे, असा उल्लेख शिंदे यांनी केला. 

शुक्रवारची संधी साधली 
'बहुतांश आमदार हे शुक्रवारी दुपारीच आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी विधिमंडळातून बाहेर पडतात. मुख्यमंत्री असताना मी हे हेरले आणि एका जिल्ह्यासाठी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव शुक्रवारीच पटलावर आणला व तो विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करून घेतला. सोमवारी पुन्हा सदन सुरू झाल्यावर माझ्या प्रस्तावाला विरोध करणारे सभागृहात आले व त्यांना त्या दिवशी कळाले की, प्रस्ताव मंजूर झाला,' हा किस्सा शिंदे यांनी सांगितल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com